Chinchwad News : पिंपरी चिंचवड पोलीस दलातील 16 टक्के पोलिसांना कोरोना

कोरोनामुळे शहर पोलिसातील दुसरा मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस दलात कोरोनाची टक्केवारी वाढत आहे. 15 मे रोजी शहर पोलिसात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर सर्वच पोलीस स्टेशन, गुन्हे शाखा आणि विविध पथकांमधील पोलिसांना कोरोनाने गाठले आहे. शहरातील तब्बल 16 टक्के पोलिसांना कोरोना झाला आहे. त्यातच कोरोनामुळे शहर पोलीस दलातील दुसरा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. सुरुवातीला दोन महिने शहर पोलीस दलात एकही कोरोना रुग्ण नव्हता. 15 मे रोजी शहर पोलीस दलात कोरोनाने शिरकाव केला. एका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याला प्रथम कोरोनाची लागण झाली.

त्यानंतर शहर पोलीस दलात कोरोनाचा संसर्ग वाढतच गेला. आयुक्तालय स्तरावर पोलिसांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी, कोरोनापासून संरक्षण व्हावे यासाठी विविध प्रयत्न करण्यात आले. तरीही हे प्रमाण वाढत गेले.

आज (23 सप्टेंबर 2020) पर्यंत पिंपरी चिंचवड शहरात कार्यरत असलेल्या 453 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

अनेक पथके बरखास्त करून तत्कालीन पोलीस आयुक्तांनी सर्व पोलिसांना कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी रस्त्यावर उतरवले. आता कोरोनाने पोलीस दलालाच वेढा दिला आहे. सुमारे 16 टक्क्यांहून अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

काही पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना दोनदा कोरोनाची लागण झाली आहे. अनेक गुन्ह्यांचा तपास करताना विविध शहरांमध्ये गुन्हेगारांच्या शोधात फिरताना, तपासासाठी गुन्हेगारांना घेऊन फिरताना देखील अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे.

वाहन चोरीच्या गुन्ह्यातील एका आरोपीच्या संपर्कात आलेल्या गुन्हे शाखेच्या एका संपूर्ण टीमला कोरोनाची लागण झाली आहे. आधीच मनुष्यबळ कमी त्यात कोरोनाचा खोडा आल्याने पोलीस दलात चिंतेचे वातावरण आहे.

या चिंतेतूनही पिंपरी चिंचवड पोलीस शहराच्या सुरक्षेसाठी निष्ठेने उभे राहत आहेत. 453 पैकी 404 पोलिसांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. 47 पोलिसांवर सध्या उपचार सुरू असून दोन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहर पोलीस दलातील कोरोनाचा दुसरा बळी

आळंदी पोलिस ठाण्यातील कर्मचारी अंबरनाथ रामजी कोकणे (वय 56, रा. पोलीस कॉलनी, मोशी) यांचा 21 सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. त्यांना श्वासासंबंधी लक्षणे जाणवू लागल्याने त्यांना पिंपरी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली होती.

चाचणीचा अहवाल येण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. 22 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा त्यांचा चाचणी अहवाल आला. त्यामध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे सांगण्यात आले. कोकणे आळंदी पोलीस ठाण्यात गार्ड ड्युटीवर कार्यरत होते.

30 ऑगस्ट रोजी कोरोनामुळे शहर पोलीस दलातील पहिला मृत्यू झाला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.