Chinchwad News : पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील 390 कर्मचाऱ्यांना बढती

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील 390 पोलीस कर्मचाऱ्यांना सेवाजेष्ठतेनुसार बढती देण्यात आली आहे. यासाठी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी मंगळवारी (दि. 29) मंजुरी दिली आहे.

बढती मिळालेल्या पोलिसांमध्ये 95 पोलीस हवालदारांना सहायक फौजदारपदी बढती मिळाली आहे. पोलीस नाईक असलेल्या 115 जणांना पोलीस हवालदार तर पोलीस शिपाई असलेल्या 180 जणांना पोलीस नाईक म्हणून पदोन्नती देण्यात आली.

सुरुवातीला पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय आस्थापनेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची निवडसूची तयार करण्यात आली होती. त्यानुसार शिफारस करण्यात येऊन बढती करण्यात आली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्याकडील सामाजिक सुरक्षा पथकाची जबाबदारी काढण्यात आली आहे. या पथकाची धुरा सहायक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. तसेच पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचे वाचक म्हणून देखील डॉ. डोंगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्याकडे सध्या जनसंपर्क अधिकारी या पदाची जबाबदारी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.