Chinchwad News: चिंचवडमध्ये रविवारी ‘अभाविप’चे 55 वे प्रदेश अधिवेशन

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अभाविप) 55 वे महाराष्ट्र प्रदेशचे एक दिवसीय अधिवेशन येत्या रविवारी ( दि. ७) पहिल्यांदाच चिंचवड येथे होणार आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत अधिवेशनाचे उदघाटन होणार आहे. शैक्षणिक, सामाजिक, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती असे विविध प्रस्ताव या अधिवेशनात पारित केले जाणार आहेत.

याबाबतची माहिती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेशमंत्री स्वप्नील बेगडे, स्वागत समितीचे सचिव मोरेश्व शेडगे यांनी आज (शुक्रवारी) पत्रकार परिषदेत दिली. पिंपरी-चिंचवड महानगर अध्यक्षा प्रा. शिल्पा जोशी, महानगर मंत्री प्रथमेश रत्नपारखी, व्यवस्था प्रमुख कृष्णा बंडलकर यावेळी उपस्थित होते.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात रविवारी सकाळी साडेआठ वाजता ध्वजारोहन होऊन अधिवेशनाची सुरुवात होणार आहे. प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत साडेदहा वाजता अधिवेशनाचे उदघाटन होणार आहे.

भाषण सत्रात राष्ट्रीय सह संघटनमंत्री जी. लक्ष्मण मार्गदर्शन करतील. प्रमुख अतिथी म्हणून क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष, पद्मश्री गिरीश प्रभुणे, अभाविपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. छगन  पटेल, महापौर उषा ढोरे यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

मागीलवर्षीचा आढावा मांडण्यात येणार आहे. आगामी वर्षासाठी प्रदेशमंत्री, प्रदेशाध्यक्षांची निवड होणार आहे. प्रदेशमंत्री सिद्धेश्वर लटपटे, प्रदेशाध्यक्ष प्रा. सारंग जोशी असणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 150 कार्यकर्ते उपस्थित राहतील.

मोरेश्वर शेडगे म्हणाले, पिंपरी-चिंचवड महानगरात पहिल्यांदाच हे अधिवेशन होत आहे. आत्मनिर्भर भारत आणि शैक्षणिक धोरण या थिमवर अधिवेशन होत आहे. शहरात अधिवेशन होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अभाविपमधून लाखो कार्यकर्ते घडले आहेत.

प्रदेशमंत्री स्वप्नील बेगडे म्हणाले, शैक्षणिक व सामाजिक प्रस्ताव मांडले जाणार आहेत. महाराष्ट्रातील शैक्षणिक सद्यस्थितीवर प्रामुख्याने क्यूआर कोडच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात क्रांती केल्याने, क्रांती केलेल्या कामाची दखल घेतली. युनेस्को आणि लंडनस्थित वारकी फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार शिक्षक रणजीतसिंह दिसले गुरुजी यांना मिळाला. त्यांचे अभिनंदन करण्यात येणार आहे.

कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली नसतानाही शुल्क घेण्यात आले. त्यामुळे ते परत करण्यात यावे. तसेच विद्यार्थ्यांची डीबीटी शिष्यवृत्ती व शैक्षणिक साहित्य भत्ता विद्यार्थ्यांना देण्यात यावा अशा आशयाचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे.

श्रीराम मंदिराच्या निधी संकलनासाठी समाजातून मिळत असणारा पाठिंबा तसेच इच्छेनुसार समर्पण करावे, असे आवाहन सामाजिक प्रस्तावाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

कोरोना काळात आरोग्य, स्वच्छता, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, अंगणवाडी सेविका यांनी निरपेक्षपणे समाजाची सेवा केली. त्यांचे अभिनंदन करणारा ठराव मांडण्यात येणार आहे. राज्यातील महिला असुरक्षित आहेत. त्यावर विचार-मंथन करण्यात येणार आहे.

अधिवेशनाच्या समारोपात नवनिर्वाचित प्रदेशमंत्री अभाविपची आगामी दिशा ठरवतील. तसेच यावेळी प्रदेशाध्यक्ष कार्यकारिणीची घोषणा केली जाणार आहे. ध्वजारोहण करुन अधिवेशनाती सांगता होईल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.