Chinchwad News : भाऊ गृहमंत्री असल्याचं भांडवल एसीपी राजाराम पाटील यांनी कधीच केलं नाही – अजित पवार

दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या आठवणींना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून उजाळा

एमपीसी न्यूज – स्वतःचा सख्खा भाऊ राज्याचा गृहमंत्री असताना सुद्धा सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांनी त्याचे कधीच भांडवल केले नाही. अतिशय शांत, सरळ खाली मान घालून काम करणारा अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांचे कौतुक केले. एखाद्या पोलीस अधिका-याचा लांबचा नातेवाईक जरी गृहमंत्री असला तरी तो संपूर्ण पोलीस डिपार्टमेंट चालवतो, असा टोला देखील त्यांनी काही अधिका-यांना लगावला.

माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांचे बंधू सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम रामराव पाटील (आर. आर. पाटील) यांची कोल्हापूर पोलीस दलातील करवीर विभागात पोलीस उपाधीक्षक पदावर पिंपरी-चिंचवड येथून बदली झाली. त्यानिमित्त त्यांचा आयुक्तालयाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अजित पवार यांनी दिवंगत नेते माजी गृहमंत्री आर.  आर. पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला.

अजित पवार म्हणाले. “आर. आर. पाटील हे सर्वाधिक काळ गृहमंत्री राहिले. तब्बल 12 वर्ष ते गृहमंत्री होते. दोन वेळा ते गृहमंत्री राहिले, तसेच ते काही काळ उपमुख्यमंत्री देखील होते. त्यांचे बंधू सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम रामराव पाटील त्यावेळीही पोलीस अधिकारी होते. त्यांनी कधीही गृहमंत्र्याचा भाऊ असल्याचे दाखवले नाही. भाऊ गृहमंत्री असल्याचे भांडवल सहाय्यक पोलीस आयुक्त पाटील यांनी कधीच केले नाही.

आता एखाद्याचा कुठून तरी लांबचा नातेवाईक गृहमंत्री असला तरी तो सगळं डिपार्टमेंट चालवत असतो. बीएस्सी फिजिक्स मधून क्षिशण घेऊन त्यांनी पोलीस उपनिरीक्षक पदावर 1987 साली पोलीस सेवा सुरु केली. आजवर त्यांची 33 वर्ष पोलीस सेवा झाली आहे. एसीपी पाटील यांचे सख्खे भाऊ गृहमंत्री असताना सुद्धा त्यांनी 20 वर्ष साईड ब्रांचला काम केलं. नाहीतर अनेक अधिकारी असे असतात जे क्रिम पोस्टिंगसाठी धडपडतात.

पाटील यांनी त्यांच्या सेवाकाळात 651 बक्षिसे मिळवली. 15 ऑगस्ट 2006, 15 ऑगस्ट 2019 रोजी त्यांना राष्ट्रपती पदक मिळाले आहे. 2006 साली पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह मिळाले. राज्यातल्या साडेबारा कोटी जनतेच्या वतीने पाटील यांच्या कार्याला शुभेच्छा देतो, असे म्हणत अजित पवार यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त पाटील यांना वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.