Chinchwad News: ऑगस्ट महिन्यात 3 हजार 800 जणांविरोधात सरकारी आदेशाच्या उल्लंघनाची कारवाई

ऑगस्ट महिन्यातील पहिले तीन आठवडे कारवाईचा चांगला जोर राहिला. मात्र त्यानंतर कारवाई कमी झाली असल्याचे आकड्यांवरून दिसत आहे.

एमपीसी न्यूज – कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात टाळेबंदी, जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. कारवाईची ही मोहीम टाळेबंदी लागू केल्यापासून सुरु आहे. ऑगस्ट महिन्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 3 हजार 810 जणांवर सरकारी आदेशाच्या उल्लंघनाची कारवाई केली आहे.

कोरोना विषाणूचा फैलाव होऊन साथ पसरली. त्यात कोरोनावर अद्याप लस अथवा जालीम उपाय मिळालेला नाही. अशा परिस्थितीत खबरदारी घेऊन सावध राहणे, हाच एक उपाय सध्या प्रशासनासमोर आहे.

त्यानुसार मार्च महिन्यात टाळेबंदीची घोषणा करण्यात आली. हळूहळू ही टाळेबंदी कठोर केली गेली. सर्व दुकाने, कंपन्या, कारखाने, मॉल, सार्वजनिक, खासगी वाहतूक बंद करण्यात आली.

मध्यंतरी काही काळासाठी जनजीवन ठप्प झाले. तरीही कोरोनाची साथ पसरत राहिली. जनजीवन अनेक दिवस ठप्प ठेवणे नागरिक आणि सरकार दोन्हींच्या हिताचे नाही. याचे दूरगामी परिणाम होण्याचा धोका आहे.

त्यामुळे खबरदारीच्या सूचना देऊन प्रशासनाने टाळेबंदीतून काही प्रमाणात सूट दिली. नागरिकांचे जनजीवन पुन्हा पूर्वपदावर येऊ लागले आहे. परंतु अद्यापही अनेक अस्थापना बंदच आहेत.

प्रशासनाने टाळेबंदी, जमावबंदीचे आदेश दिले. त्याची अंमलबजावणी पोलिसांकडून केली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, परवानगी नसताना दुकाने सुरु करणे, दुकानांसमोर गर्दी करणे, कोरोनाची साथ पसरविण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणा-या नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.

भारतीय दंड विधान कलम 188 नुसार ही कारवाई केली जात आहे. प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणा-या नागरिकांवर गुन्हे, खटले दाखल केले जात आहेत. या गुन्ह्यात एक महिन्याचा साधा कारावास किंवा 200 रुपये दंड होऊ शकतो. तसेच काही बाबतीत दोन्ही दंड करण्याची देखील कायद्यात तरतूद आहे.

त्यामुळे नागरिकांनी सावध राहून प्रशासनाच्या आदेशाचे पालन करावे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी खबरदारी घ्यावी, असे आवाहन वारंवार प्रशासनाकडून केले जात आहे.

ऑगस्ट महिन्यातील पहिले तीन आठवडे कारवाईचा चांगला जोर राहिला. मात्र त्यानंतर कारवाई कमी झाली असल्याचे आकड्यांवरून दिसत आहे. पहिल्या तीन आठवड्यात कारवाईची सरासरी संख्या 138 इतकी होती. तर हीच सरासरी पुढील दहा दिवसात 91 वर आली.

लॉकडाऊन (अनलॉक 4) चा कालावधीत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरात देखील फौजदारी दंड प्रकिया संहिता सन 1973 कलम 144 (1) (3) नुसार जमावबंदी, वाहतूक आणि संचारबंदीचे सुधारित आदेश पारित करण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.