Chinchwad News: ‘घरकुल’मधील घराची विक्री अथवा भाड्याने दिल्यास कारवाई – महापौर ढोरे

एमपीसी न्यूज – घरकुल योजनेत मिळालेले घर प्रत्येकाने व्यवस्थित सांभाळले पाहिजे. आपल्याला मिळालेले घर आपणांस नक्कीच सकारात्मक उर्जा आणि समाधान देईल. मात्र, मिळालेले घर कोणीही विकू अथवा भाड्याने देऊ नये. महापालिकेचे यावर सतत लक्ष असेल. घराची विक्री किंवा भाड्याने देणा-यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा महापौर उषा ढोरे यांनी दिला आहे.

केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखलीतील प्राधिकरण सेक्टर क्र. 17 आणि 19 येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना राबविण्यात येत आहे.

या घरकुल प्रकल्पातील 3 सोसायट्यांच्या इमारतीमधील एकूण 126 लाभार्थ्यांच्या सदनिकांची संगणकीकृत सदनिका वाटप सोडत आज महापौर ढोरे यांच्या हस्ते काढण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

चिंचवड येथील ॲटो क्लस्टरमध्ये झालेल्या या कार्यक्रमास सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, शहर सुधारणा समिती सभापती सोनाली गव्हाणे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, सुनिता तापकीर, शारदा सोनवणे, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश आगळे, प्रशासन अधिकारी श्रीकांत कोळप, कार्यालयीन अधिक्षक संभाजी घुले, मुख्य लिपिक सुनिल माने यांच्यासह या विभागातील राजेश जाधव, सुजाता कानडे, दिपक पवार, संदीप भागवत, योगिता जाधव, अंजली खंडागळे तसेच समन्वयक दर्शन शिरूडे आदींसह लाभार्थी उपस्थित होते.

पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, शहरीतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तसेच विविध प्रकल्पामुळे बाधित होणा-यांसाठी महापालिकेने घरे उपलब्ध करून देण्याचे काम हाती घेतले आहे. या योजनांना अधिक गती देण्याचा प्रयत्न केला जाईल.

लाभार्थ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून घरे उपलब्ध करून देण्यासाठी आणि प्रत्येकाला घर मिळेल यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू.

यावेळी नियोजित घरकुल सहकारी गृहरचना सोसायटी क्रमांक 137 इमारत क्रमांक सी-24 चे प्रतिनिधी अर्जुन शिंदे, सोसायटी क्रमांक 138 इमारत क्रमांक सी-13 चे प्रतिनिधी बाबाजी वाळुंज, सोसायटी क्रमांक 139 इमारत क्रमांक डी-30चे प्रतिनिधी अशोक कासुळे यांना संगणकीय सदनिका सोडतीची यादी महापौरांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आली.

सहाय्यक आयुक्त राजेश आगळे यांनी प्रकल्पाची माहिती दिली. तसेच घराचा वापर, येणारी देयके आणि बँकेचे हप्ते वेळेवर भरण्याबाबत मार्गदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.