Chinchwad News : शहराला बकालपणा आणणा-या प्रत्येकावर कारवाई होणार, त्यासाठी नागरिकांनी पुढे यावे – पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश

एमपीसी न्यूज – भूमाफिया, गुन्हेगार, फसवणूक करणारे बांधकाम व्यावसायिक आणि त्यांना मदत करणारे अनेकजण यांच्यामुळे शहराला बकालपणा येत आहे. पिंपरी-चिंचवड शहराला बकालपणा आणणा-या प्रत्येकावर कारवाई होणार असल्याचे आश्वासन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिले.

पिंपरी-चिंचवड शहरातील हाऊसिंग सोसायट्यांचे पदाधिकारी, पोलीस, महापालिका प्रशासन यांची गुरुवारी (दि. 5) चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात बैठक झाली. यावेळी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश बोलत होते.

बैठकीसाठी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पीएमआरडीचे निलेश अष्टेकर, पीएमपीएल सरव्यवस्थापक चेतना कुरमुडे, परिवहन अधिकारी अतुल आदे, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे महापालिका आणि पोलीस अधिकारी, तसेच शहरातील हाऊसिंग सोसायट्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

संपूर्ण शहरात ठिकठिकाणी फुटपाथवर अतिक्रमण झाल्याने फुटपाथ झाकले गेले आहेत. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागते. यामुळे वाहतूक कोंडी आणि वाहतुकीच्या समस्या निर्माण होतात. शहरातील फुटपाथ रिकामे करणे आवश्यक आहे. शहरात सर्वत्र सम-विषम तारखेला पार्किंग सुरु करावी.

शिस्त रिक्षाचालक व त्यांच्याकडून आकारले जाणारे अवाजवी दर, शहरात सीसीटीव्ही बसवणे, शहरातील सर्व सिग्नल सुरु करणे, शहरात माझा शेजारी, माझा पहारेकरी ही संकल्पना राबवणे, सोसायट्यांना माथाडी आणि गुंडांचा त्रास यांसारख्या विविध विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.

शहरात अनेक प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्ती आहेत. त्याविरोधात लढण्यासाठी पोलीस सक्षम आहेत. पण नागरिकांनी देखील पोलिसांकडे येऊन तक्रारी द्यायला हव्यात. एखाद्या पोलीस अधिका-याने नागरिकांच्या तक्रारी ऐकून न घेता त्याकडे दुर्लक्ष केले अथवा गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्यास त्या अधिका-यांवर कठोर कारवाई केली जाईल. भूमाफिया असो, गुन्हेगार असो, बांधकाम क्षेत्रातील ठग असो त्या सर्वांवर कारवाई होईल, असे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी बैठकीत सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.