Chinchwad News: एल्प्रो सिटी स्क्वेअर शॉपिंग मॉल व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांची पिळवणूक, महापौरांना निवेदन

एल्प्रो सिटी स्क्वेअर शॉपिंग मॉल व्यवस्थापनाचे कामगारांप्रती धोरण अत्यंत वाईट आहे. त्यामुळे कामगार दबावाखाली काम करत आहेत.

एमपीसी न्यूज – चिंचवड गावात नव्याने सुरु झालेल्या एल्प्रो सिटी स्क्वेअर शॉपिंग मॉल व्यवस्थापनाकडून तिथे काम करणा-या कामगारांची पिळवणूक केली जात आहे. तसेच टाळेबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केले जात आहे, असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी केला आहे. नाईक यांनी याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर उषा ढोरे यांना निवेदन दिले आहे.

प्रदीप नाईक यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एल्प्रो सिटी स्क्वेअर शॉपिंग मॉल व्यवस्थापनाचे कामगारांप्रती धोरण अत्यंत वाईट आहे. त्यामुळे कामगार दबावाखाली काम करत आहेत. मॉलचे व्यवस्थापक कर्मचा-यांना आपल्या धाकात ठेवतात. तसेच त्यांना खासगी नोकर असल्याची वागणूक देतात.

मॉलमधील कर्मचा-यांची दुपारच्या जेवणाची सुट्टी केवळ अर्ध्या तासाची आहे. एवढ्या कालावधीत जेवण करण्यासाठी कर्मचा-यांची धावपळ होते. ती वेळ वाढविण्यासाठी महापालिका प्रशासनाने मॉल व्यवस्थापनाला निर्देश द्यावेत.

शासनाने अनलॉक तीनमध्ये कामाची वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी सात अशी ठरवून दिली आहे. मात्र एल्प्रो सिटी स्क्वेअर शॉपिंग मॉल व्यवस्थापन या वेळेचे उल्लंघन करत आहे. त्यामुळे मॉल व्यवस्थापनावर कायदेशीर कारवाई कारवाई, असेही नाईक यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

स्थानिक पातळीवर कारवाई न झाल्यास याबाबत कामगार मंत्री, आरोग्य मंत्री यांच्याकडे तक्रार केली जाणार आहे, असेही नाईक यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.