Chinchwad News : लायक व्हा, लोक आपोआप लाईक करतील – कृष्णप्रकाश

एमपीसी न्यूज – व्हाट्सअप युनिव्हर्सिटी आणि फेसबुकच्या जाळ्यात अडकू नका. खोटी प्रसिद्धी आणि मोठेपणा काही कामाचा नसतो. सोशल नेटवर्किंग साइटवर मिळणाऱ्या लाईक पेक्षा जीवनात लायक व्हा, लोक आपोआप लाईक करतील, असा प्रेरणादायी कानमंत्र पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी पोलीस पाल्यांना दिला.

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र व पुणे जिल्हा विकास केंद्र यांच्या सहकार्याने पोलिस पाल्यांसाठी आयोजित उद्योजकता परिचय कार्यशाळेत मार्गदर्शन करताना कृष्णप्रकाश बोलत होते.

युवा पिढी सोशल मिडिया आणि व्हर्च्युअल दुनियेत अधिक रमताना दिसत आहे. त्यांचा बाहेरील जगाशी संपर्क तुटतो आहे. या पिढीला योग्य दिशा देण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळाले पाहिजे. त्यासोबतच युवा पिढीने देखील खोटी प्रसिद्धी आणि मोठेपणा यातून बाहेर पडलं पाहिजे, असे आवाहन पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी केले.

सोशल नेटवर्किंग साइटवर लाईक्स मिळवण्यासाठी युवा पिढी तासंतास त्यावर वेळ घालवते. त्यापेक्षा आयुष्यात एक ध्येय ठरवा आणि ते मिळवण्यासाठी भरपूर मेहनत घ्या. तुम्ही यशस्वी व्हाल, लायक व्हाल, तेव्हा लोक आपोआप तुम्हाला लाईक करतील. स्टेट्स सिम्बॉल आणि बडेजाव मिरवण्यासाठी वायफळ पैसा खर्च करू नका, असे आवाहन त्यांनी पोलिस पाल्यांना केले.

आयुष्यात ‘फोकस्ड’ रहा. जे ध्येय ठरवाल ते मिळवण्यासाठी मेहनत घ्या. आयर्नमॅन व अल्ट्रामॅन स्पर्धेसाठी तयारी करत असताना मी एक नियोजन केले होते, तेच मी काटेकोर पाळायचो. झोपण्याची व पहाटे उठण्याची वेळ ठरलेली असायची आणि सरावाच्या वेळी फक्त सराव. त्यामुळे आपल्या ध्येय्याप्रती प्रामाणिक रहा आणि खोट्या प्रसिद्धी व मोठेपणाच्या मागे धावू नका, असा मोलाचा सल्ला कृष्णप्रकाश यांनी पोलिस पाल्यांना दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.