Chinchwad News : पिंपरी चिंचवड पोलिसांच्या ड्रग्ज प्रकरणी कारवाईनंतर बॉलीवूड कनेक्शन समोर येईल?

एमपीसी न्यूज – ड्रग्ज प्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत ड्रग्जचे आंतरराज्यीय कनेक्शन उघड केले आहे. पोलिसांच्या या कारवाईत महाराष्ट्र आणि गुजरात मधून 20 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

तयार केलेले ड्रग्ज विक्रीसाठी आरोपींची मुंबई आणि गुजरातवर जास्त मदार होती. आरोपींनी मुंबईतील अंधेरी, जोगेश्वरी, मुलुंड व विटी मार्ग परिसरात ड्रग्ज विक्री केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. त्यामुळे या ड्रग्जचे बॉलीवूड कनेक्शन समोर येईल का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अटक आरोपींनी रांजणगाव येथील एका कंपनीत तब्बल 132 किलो तर रायगड जिल्ह्यातील महाड येथील दोन कंपनीत 10 ते 15 किलो असे जवळपास 140 ते 145 किलो एमडी ड्रग्ज तयार केले. त्यांपैकी शंभर किलोहून अधिक ड्रग्जची त्यांनी गुजरात आणि मुंबई येथे विक्री केली. उर्वरित वीस किलो ड्रग्जची विक्री करण्यासाठी मुंबईला जात असताना 7 ऑक्टोंबर रोजी पिंपरी चिंचवडच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने आरोपींना ताब्यात घेतले. 20 कोटी रूपयांचे हे मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

याप्रकरणी अटक वीस आरोपीमध्ये ड्रग्ज तयार करण्यासाठी प्रशिक्षण देणारा प्रशिक्षक, फॅक्टरी मालक, केमिकल उपलब्ध करून देणारा, आणि ड्रग्जची विक्री करणारे यांचा समावेश आहे. तयार करण्यात आलेल्या ड्रग्जची गुजरातसह मुंबईच्या विविध भागात विक्री करण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

कोट्यावधी रुपयांची उलाढाल असलेल्या या ड्रग्ज प्रकरणात बॉलीवूड कनेक्शन समोर येईल का ? अशी शंका उपस्थित राहण्यासाठी जागा आहे. याप्रकरणाचा सखोल तपास सुरू असून याबाबत अजून माहिती समोर येण्याची शक्यता आहे. ड्रग्जच्या विक्रीतून करण्यात येणा-या आर्थिक व्यवहारांची कसून तपासणी देखील करण्यात येत आहे.

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलीवूड मधील ड्रग्ज कनेक्शन समोर आले होते. या चौकशीत बॉलीवूड मधील अनेक मोठ्या नटनट्यांची नावे समोर आली व अनेकांना एनसीबीच्या चौकशीचा सामना करावा लागला होता. त्यात सुशांतची गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली होती.

काही दिवसांपूर्वी कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष यांच्या घरावर एनसीबीने छापा टाकत 86.5 ग्रॅम गांजा जप्त केला होता. त्यानंतर दोघांनाही जेलची हवी खावी लागली होती. अभिनेता अर्जून रामपाल, सारा अली खान, दिपीका पादुकोन, श्रद्धा कपूर यांनाही एनसीबीच्या चौकशीचा सामना करावा लागला होता.

पिंपरी चिंचवड पोलिसांनी केलेली कारवाई मोठी आहे. जवळपास 150 किलो एमडी ड्रग्ज आणि कोट्यावधी रूपयांचा सबंध यात आहे. तपासात याच काही बॉलीवूड कनेक्शन समोर येईल का ? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.