Chinchwad News : बिर्ला हॉस्पिटलचे व्यवस्थापन महापालिका किंवा राज्य शासनाच्या नियंत्रणात आणा : श्रीजीत रमेशन

एमपीसीन्यूज : थेरगाव येथील आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल प्रशासनाकडून रुग्णांच्या नातेवाईकांना केली जाणारी दमबाजी, वाढीव बिल आकारणी, अशा अनेक वाढत्या तक्रारी पाहता या रुग्णालयाचे व्यवस्थापन पिंपरी चिंचवड महापालिका अथवा राज्य शासनाच्या नियंत्रणात आणावे, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजीत रामेशन यांनी केली आहे.

यासंदर्भ रामेशन यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांसह राज्याच्या आरोग्य विभाग आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना रामेशन म्हणाले, आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलवर अनेक गंभीर आरोप होत आहेत. या हॉस्पिटलमध्ये शासनाच्या नियमाला हरताळ फासून कोरोना रुग्णांची लूट केली जात आहे. हॉस्पिटल प्रशासन मनमानी कारभार करुन रुग्णांकडून जादा बिल वसूल करीत आहे. रुग्णाने बिलाचे पैसे न भरल्यास दमबाजी केली जात असल्याच्या अनेक तक्रारी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांकडून यापूर्वी करण्यात आल्या आहेत.

बिर्ला हॉस्पिटल प्रशासनाच्या मनमानी कारभार व जादा बिल आकारणी बाबत यापूर्वी महापालिका प्रशासनाकडून रुग्णालयाला नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. मात्र, ठोस कारवाई होत नसल्याने या रुग्णालयाच्या कारभारात कोणताही बदल होत नाही. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

या सर्व बाबी विचारात घेता बिर्ला हॉस्पिटलचे व्यवस्थापन महापालिका किंवा राज्य सरकारच्या नियंत्रणात आणणे उचित ठरेल , असे रमेशन यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.