Chinchwad News: ईएसआय हॉस्पिटलमधील कोरोनाग्रस्त रुग्णांना निकृष्ट जेवण पुरविणाऱ्या हॉटेलचा ठेका रद्द

याबाबतची तक्रार सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली होती. : Canceled hotel contract for providing substandard meals to coronary patients at ESI Hospital

एमपीसीन्यूज  : चिंचवड- मोहननगर येथील ईएसआय हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांच्या जेवणात माश्या व आळ्या आढळून आल्याच्या तक्रारी आल्याने पालिकेने ‘बिग ट्री रेस्टॉरंट अँड बार’ या ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस बजावत जेवण, नाष्टा पुरविण्याचा ठेका रद्द करण्यात आला.

तसेच या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई प्रस्तावित केली आहे. याबाबतची तक्रार सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली होती.

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. रुग्णसंख्या 30 हजाराच्या उंबरठ्यावर आहे. पालिका, विविध खासगी रुग्णालयात सक्रिय रूग्णांवर उपचार केले जात आहे.

चिंचवड, मोहननगर येथील ईएसआय रुग्णालयात 100 कोविड रुग्णांवर उपचार केले जात आहेत. या रुग्णांना महापालिका ठेकेदाराच्या माध्यमातून जेवण आणि नाष्टा पुरविते.

पालिकेने बिग ट्री रेस्टॉरंट अँड बार यांना जेवण व नाष्टा पुरविण्याचा ठेका दिला होता. या ठेकेदाराने पुरविलेले जेवण निकृष्ट दर्जाचे असून जेवणामध्ये माशा, आळ्या सापडल्या होत्या.

काही रुग्णांनी जेवणामध्ये अळ्या सापडल्याची तक्रार केली होती. त्यानुसार पालिकेने ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच त्यांचा जेवणाचा व नाष्टा पुरविण्याचा ठेका 7 ऑगस्ट रोजी संपुष्टात आणला आहे.

तसेच त्यांच्यावर नियमानुसार दंडात्मक कारवाई प्रस्तावित केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.