Chinchwad News : भाजपच्या माजी नगरसेविका जयश्री गावडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – भाजपच्या माजी नगरसेविका जयश्री गावडे आणि त्यांच्या पती विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गावडे यांच्या पुतण्याने फिर्याद दिली आहे.

 

आशिष मोरेश्‍वर गावडे (वय 31, गावडे पार्क, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी जयश्री वसंत गावडे आणि त्यांचे पती वसंत धोंडीबा गावडे (रा. गावडे पार्क, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी आशिष यांचे आजोबा धोंडिया गावडे यांनी सुरभी हा बंगला 25 वर्षापूर्वी फिर्यादी यांची आई आणि चुलते वसंत गावडे या दोघांच्या नावावर केला होता. मात्र चुलते वसंत गावडे यांनी आशिष यांच्या आईच्या परस्पर बंगला गहाण ठेवून बॅंकेकडून 70 लाख रुपयांचे कर्ज घेतले. कर्ज न फेडल्यामुळे बॅंकेचे अधिकारी वारंवार घरी येऊ लागल्याने फिर्यादी यांचे कुटुंब गावडे चेंबर्स येथे जुन्या घरी राहण्यास गेले. तर चुलते वसंत गावडे प्राधिकरणातील एका बंगल्यात राहण्यासाठी गेले. वसंत गावडे यांनी सदरचा बंगला कुलमुत्यारपत्राच्या आधारे स्वतःच्या नावावर करून घेतल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे.

वडिलोपार्जित बंगला असल्याने कर्ज फेडण्याबाबत फिर्यादी यांनी चुलते वसंत गावडे यांना विचारले असता बंगल्याच्या किमतीपेक्षा कर्ज आणि व्याजाची रक्‍कम जादा असल्याने बंगला सोडविणार नाही. तसेच कर्ज फेडण्यासाठी मदतही करणार नाही, असे फिर्यादी यांना सांगितले. अखेर बॅंकेने त्या बंगल्याचा लिलाव जाहीर केला. फिर्यादी आशिष यांनी दोन कोटी 61 लाख रुपये भरून तो बंगला लिलावात विकत घेतला. बॅंकेने तो बंगला फिर्यादी, त्यांचा भाऊ आणि आईच्या नावावर करून दिला.

18 सप्टेंबर 2020 रोजी फिर्यादी हे त्या बंगल्यात राहण्यासाठी आले. 20 सप्टेंबर 2020 रोजी चुलते वसंत गावडे आणि जयश्री गावडे हे दोघेजण बंगल्यात आले. फिर्यादी यांच्या आईस म्हणाले की, हा बंगला माझ्या वडिलांचा आहे, तो तू परस्पर स्वतःच्या नावावर करून कसा घेतला. याचा परिणाम तुला भोगावा लागेल. आम्ही सर्वजण येथेच राहणार. तुम्हाला काय करायचे ते करा, अशी धमकी दिली. तसेच फिर्यादी यांचा भाऊ अमित यास रोहित वसंत गावडे यांनी हाताने मारहाण केली. तसेच जयश्री आणि वसंत गावडे यांनी अर्ध्या बंगल्याचा परस्पर जबरदस्तीने ताबा घेतल्याचेही फिर्यादीमध्ये म्हटले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

याबाबत माजी नगरसेविका जयश्री गावडे म्हणाल्या, “तो बंगला आम्ही दीड कोटींचे कर्ज काढून त्यात आणखी रक्‍कम टाकून बांधला आहे. ते घर आमचेच असून सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आम्हाला बदनाम करण्यासाठी हे कारस्थान रचण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत आम्ही याबाबत पत्रकार परिषद घेऊन पुरावे सादर करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.