Chinchwad News: पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या आरोपींवर पोलीस आयुक्तांनी फेकले झाड; अन आरोपी सापडले…

एमपीसी न्यूज – एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला साजेसा थरार पिंपरी चिंचवड पोलीस आणि खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींमध्ये झाला. भर दिवसा गोळ्या झाडून एका सराईत गुन्हेगाराचा खून करून पळून गेलेल्या आरोपींना पोलिसांनी चाकण जवळील एका जंगलातून ताब्यात घेतले. त्यावेळी पोलिस आणि आरोपींमध्ये गोळीबार झाला. त्यानंतर आरोपींचा पाठलाग करताना पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आरोपींवर एक झाड फेकले आणि आरोपी खाली पडले. त्यानंतर आरोपींच्या मुसक्या अवळण्यात आल्या.

गणेश हनुमंत मोटे (वय 23, रा. सांगवी, मुळ रा. वैराग ता मोहोळ जि. सोलापूर), महेश तुकाराम माने (वय 23, रा. कवडेनगर सांगवी पुणे मुळ रा. पाठसांगवी ता भुम जि. उस्मानाबाद), अश्विन आनंदराव यादव (वय 21, रा. काटेपुरम चौक विनायकनगर नवी सागंवी मुळ रा, श्रीपत पिंपरी ता बार्शी जि. सोलापुर) यांना अटक केली आहे.

योगेश रवींद्र जगताप (वय 36, रा. पिंपळे गुरव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो सराईत गुन्हेगार होता.

पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 डिसेंबर रोजी काटेपुरम चौकात योगेश जगताप याच्यावर हल्लेखोरांनी गोळीबार केला. यात दोन गोळ्या लागल्याने योगेश जगतापचा मृत्यू झाला. खून केल्यानंतर आरोपी पळून गेले. दरम्यान पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.

पोलीस आयुक्त रविवारी रात्री आळंदी पोलीस ठाण्यात एका गुन्ह्याच्या अनुषंगाने आले असता पोलिसांना माहिती मिळाली की, योगेश जगताप याच्या खून प्रकरणातील तिघेजण कुरकुंडी येथे फिरत आहेत. त्यानुसार पोलिसांनी चार पथके तयार करून आरोपींचा माग घेतला.

आरोपी कोये, कुरकुंडी येथील जंगल परिसरात असलेल्या एका घरात आरोपी लपून बसले होते. घराच्या बाजूला आरोपींची काळया रंगाची नंबर प्लेट नसलेली पल्सर मोटारसायकल झाडीमध्ये दिसली. पोलीस पाटील आणि पोलिसांच्या मदतीने घराची रेकी करण्यात आली. पोलीस आरोपींच्या दिशेने जात असताना आरोपी पळून जाऊ लागले. दोघांनी पोलिसांच्या दिशेने दोन राउंड फायर केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे यांनी देखील आरोपींच्या दिशेने फायरिंग केले.

आरोपी झाडा झुडपातून पळून जात असताना पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी तिथे पडलेले झाड उचलून आरोपींच्या अगांवर टाकले. तेव्हा आरोपी खाली पडले असता पथकातील पोलिसांनी आरोपींना पकडले. या झटापटीत आरोपी जास्तच आक्रमक व हिसंक होत होते, त्यामुळे पथकाने बळाचा वापर करून आरोपींना ताब्यात घेतले.

या कामगिरीमध्ये पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल टोणपे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने, पोलीस कर्मचारी चव्हाण, मोरे, गेगंजे, नरळे, चौधरी, मुळुक, पाटील, गायकवाड, सुर्यवंशी, बाबा, तेलेवार, कदम आदींनी सहभाग घेतला.

पोलीस आयुक्त जखमी

आरोपींसोबत झालेली झटापट आणि गोळीबार प्रकरणात पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश जखमी झाले आहेत. त्यांना किरकोळ खरचटले आहे. तसेच चार ते पाच पोलीस कर्मचाऱ्यांना देखील खरचटले आहे. ते देखील किरकोळ जखमी झाले आहेत.

आरोपींवर चाकणमध्ये नवीन गुन्हा

पोलिसांवर गोळीबार केला, शस्त्र बाळगले याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश कांबळे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तीनही आरोपींवर भारतीय दंड विधान कलम 307, 353, 34, सह आर्म ॲक्ट 3 (25) (27) सह मुंबई पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघेही आरोपी चाकण पोलिसांच्या ताब्यात आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.