Chinchwad News : तलावात बुडणाऱ्या मुलांना वाचवणाऱ्या बालविराचा पोलीस आयुक्तांच्या हस्ते सत्कार

एमपीसी न्यूज – सदगुरुनगर कचरा डेपो दीघी येथे तलावात पोहण्यासाठी गेलेली चार मुले बुडताना एका 13 वर्षीय बालविराने तिघांना तलावातून बाहेर काढले. त्यातील एका मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेत दोघांचा जीव वाचला असून मुलांचा जीव वाचवणाऱ्या बालविराचा पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सत्कार केला.

आयुष गणेश तापकीर (वय 13, रा. गुळवेवस्ती, तापकिर चाळ, भोसरी) असे या बालविराचे नाव आहे.

सोमवारी (दि. 27) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास संदीप बावना डवरी (वय 12), ओकांर प्रकाश शेवाळे (वय 13), ऋतुराज प्रकाश शेवाळे (वय 14), सुरज अजय वर्मा (वय 12, सर्व रा. चक्रपाणी वसाहत भोसरी) हे चौघेजण तलावात पोहण्यासाठी गेले होते. तलावात उतरल्यानंतर चौघेही बुडू लागले. त्याच ठिकाणी आयुष गुरे चारण्यासाठी आला होता. त्याने तलावात चौघेजण बुडत असल्याचे पाहिले आणि कुठलाही विचार न करता मुलांना वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारली.

आयुष याने संदीप डवरी, ओकांर शेवाळे, ऋतुराज शेवाळे या मुलांना तलावातून बाहेर काढले. सुरज वर्मा याला पाण्यातून बाहेर काढता आले नाही, त्यात त्याचा मृत्यू झाला. अग्निशमन विभागाच्या जवानांनी सूरजचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. ओंकार आणि ऋतुराज या दोघांना इजा झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ओंकार शेवाळे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आयुषच्या कल्पक बुद्धी आणि धाडसामुळे संदीप आणि ऋतुराज या दोघांचा जीव वाचला आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आयुषच्या धाडसाचे कौतुक केले. आयुषचा आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

<