Chinchwad News : महिलांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी पोलीस आयुक्त सकारात्मक; वुमेन्स हेल्पलाईनची माहिती

एमपीसी न्यूज – महिला अत्याचार, बालविवाह, सिग्नलवर भीक मागणारी मुले, घरगुती हिंसाचार, अनाथ आश्रम, बालकाश्रम अशा विविध मुद्द्यांवर वूमन हेल्पलाईनच्या पदाधिकारी महिलांनी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

महिलांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी पोलीस आयुक्त सकारात्मक असल्याची माहिती वूमन हेल्पलाईनच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षा नीता परदेशी आणि पिंपरी-चिंचवड अध्यक्षा अ‍ॅड. सारिका परदेशी यांनी आज (बुधवारी, दि. 16) पत्रकार परिषदेत दिली.

विविध विषयांबाबत हेल्पलाईनच्या वतीने आयुक्तांशी चर्चा करून मंगळवारी (दि. 15) निवेदन देण्यात आले. यावेळी राज्य अध्यक्षा नीता परदेशी, पिंपरी चिंचवड अध्यक्षा अ‍ॅड. सारिका परदेशी, मावळ अध्यक्षा अलका भास्कर, मंगल मुऱ्हे , जनाबाई काकडे, दिशा कुलकर्णी, प्रज्ञा हातनाळीकर, शिल्पा अनपन, स्मिता राहुडे, मोनिका पंडित, सोनाली घोडेकर, राजश्री पिंपळकर, अनघा घाटोळे आदी उपस्थित होत्या.

अ‍ॅड. सारिका परदेशी म्हणाल्या, पिंपरी चिंचवड शहरात प्रत्येक सिग्नलवर लहान मुले भीक मागताना आढळतात. तसेच छोट्या मोठ्या वस्तू विकतात. हा एक प्रकारचा गुन्हा आहे. याला पायबंद बसणे आवश्यक आहे. आळंदी येथे अनेक मंगल कार्यालये आहेत. तिथेही अल्पवयीन मुला-मुलींची, एक लग्न झालेले असताना दुसरे लग्न करणे, लग्नाचे प्रमाणपत्र दिले जाते. यावर आळा घालण्याबाबत हेल्पलाईनच्या वतीने विनंती करण्यात आली.

पुणे पोलीस आयुक्तालयात महिलांच्या विविध समस्या, तक्रारी सोडविण्यासाठी भरोसा सेल आहे. त्याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात देखील भरोसा सेल सुरू करावी. शहरात असणारे वृद्धाश्रम, महिला आश्रम, शिशुगृह, दिव्यांग आश्रम यामध्ये गैरप्रकार होत असल्याचे हेल्पलाईनच्या निदर्शनास आले असल्याचे आयुक्तांना सांगितल्याचे नीता परदेशी यांनी सांगितले.

यावर पोलीस आयुक्तांनी महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण सकारात्मक असल्याचे सांगितले. भरोसा सेल सुरु करण्याबाबत देखील आयुक्त सकारात्मक असून त्याबाबत त्यांनी सूचना दिल्या आहेत. शहरातील प्रत्येक मंगल कार्यालय चालकाला बोलवा, कागदपत्रे घ्या, चौकशी करा, असे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना आयुक्तांनी आदेश दिले असल्याचे परदेशी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.