_MPC_DIR_MPU_III

Chinchwad News : मुदतपूर्व बदलीच्या विरोधात पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांची ‘कॅट’मध्ये धाव

कॅट कोणता निर्णय देणार? पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त म्हणून संदीप बिष्णोई हेच राहणार की कृष्ण प्रकाश येणार?

एमपीसी न्यूज – एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच बदली झाल्याने पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण (कॅट) मध्ये धाव घेतली आहे. नियमानुसार किमान एक वर्ष आणि जास्तीत जास्त तीन वर्ष एखादा अधिकारी संबधित पदावर राहू शकतो. त्यानंतर त्याची बदली करता येते. या नियमाला छेद देऊन बदली केल्याचा आक्षेप घेत बिष्णोई यांनी ‘कॅट’कडे दाद मागितली आहे.

_MPC_DIR_MPU_IV

संदीप बिष्णोई यांनी महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तपदावर नियुक्तीचे आदेश दिलेले  विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश, केंद्र शासन (गृह मंत्रालयाचे सचिवालय) यांच्या विरोधात कॅटकडे आपली तक्रार नोंदविली आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरांमधील वाढती गुन्हेगारी, राजकीय घडामोडी, पिंपरी-चिंचवड शहरातील औद्योगिक वसाहत याचा पुणे शहर पोलीस आयुक्तालयावर ताण येत होता. त्यामुळे पुणे शहर आयुक्तालयातील आणि पुणे ग्रामीण मधील काही पोलीस स्टेशन मिळून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची निर्मिती करण्यात आली. 28 मे 2018 रोजी याबाबतचे आदेश देण्यात आले होते.

_MPC_DIR_MPU_II

पहिले आयुक्त म्हणून आर के पद्मनाभन यांची नियुक्ती झाली. त्यांनी पहिल्या वर्षभरात आयुक्तालयाची घडी बसवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची बदली करून त्यांच्या जागी संदीप बिष्णोई यांची 11 जुलै 2019 रोजी नियुक्ती करण्यात आली.

पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्त पदावर अपर पोलीस महासंचालक दर्जाचे अधिकारी बसतील, असे आयुक्तालयाच्या निर्मितीच्या आदेशात म्हटले होते. सुरुवातीला आलेले दोन्ही आयुक्त (आर के पद्मनाभन, संदीप बिष्णोई) अपर पोलीस महासंचालक दर्जाचे होते. मात्र, नुकत्याच झालेल्या राज्यातील बदल्यांमध्ये पिंपरी-चिंचवडचेही आयुक्त बदलणार आहेत.

यामध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाचे असलेले भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी कृष्ण प्रकाश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक हे पद अपर पोलीस महासंचालकपदाच्या तुलनेत कमी दर्जाचे आहे. कमी दर्जाच्या अधिकाऱ्याची पिंपरी-चिंचवडच्या आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली आहे, असे बिष्णोई यांनी म्हटले आहे.

आता कॅट कोणता निर्णय देणार? पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त म्हणून संदीप बिष्णोई हेच राहणार की कृष्ण प्रकाश येणार ? याची उत्सुकता संपूर्ण शहराला लागली आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.