Chinchwad News: स्थापत्य विषयक कामे पूर्ण करा; नगरसेवकांची मागणी

एमपीसी न्यूज – स्थापत्य विषयक कामे नोव्हेंबर डिसेंबर अखेर पूर्ण करावीत. मोरया गोसावी मंदीर परिसरातील रोडचे काम पूर्ण करावे. वाल्हेकरवाडीरोड वरील विद्युत विषयक कामे पूर्ण करावी. मुकाई चौक ते एम बी कंपनी पर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण करावे, मुकाई चौक ते पेट्रोल पंप येथे नो पार्कींग झोन करावा, अशा विविध मागण्या ब प्रभाग हद्दीतील नगरसेवकांनी केल्या.

महापालिकेच्या ब प्रभागामध्ये स्थापत्य, पाणीपुरवठा, विद्युत, जलनि:सारण, वैद्यकीय, आरोग्य आदी विभागांबाबत नगरसदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत महापौर उषा ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांसमवेत आज (सोमवारी) बैठक झाली. सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, नगरसदस्य राजेंद्र गावडे, सचिन चिंचवडे, बाळासाहेब ओव्हाळ, नगरसदस्या अपर्णा डोके, अश्विनी चिंचवडे, माधुरी कुलकर्णी, संगीता भोंडवे, प्रज्ञा खानोलकर, निता पाडाळे, स्वीकृत नगरसदस्य मोरेश्वर शेडगे, बिभीषण चौधरी, विठ्ठल भोईर, देवीदास पाटील आदी उपस्थित होते.

नगरसदस्यांनी त्यांच्या समस्या महापौर माई ढोरे यांच्या समोर नमूद केल्या. नगररचना व स्थापत्य विभागाने समन्वय ठेवून काम करावे. खांबावरील डीपीची झाकणे लावावीत, गोखले पार्क येथील फीडर जवळील गवत, वेली काढण्यात याव्यात. आरोग्य विभागामार्फत वेळोवेळी स्वच्छता ठेवण्यात यावी. बीआरटीस रोडवरील स्वच्छता गृह कायम बंद असते त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते, उद्यान विभागामार्फत झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात यावी, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा आदी समस्यांचा समावेश होता.

शहरातील विद्युत समस्यांबाबत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला सर्वेक्षण करण्यास सांगितले आहे. तसेच वारंवार खंडीत होणारा वीजपुरवठा आणि फिडरबाबत समस्यांची माहिती पालकमंत्री पुणे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच पुणे येथील विद्युत विभागाच्या झालेल्या बैठकीत त्यांना दिली आहे असल्याचे सांगत महापौर ढोरे म्हणाल्या बांधकामांना परवानगी देण्यापूर्वी संबंधित विभागाने सर्व आवश्यक बाबींची पाहणी करावी.

प्रशासनाकडून नगरसदस्यांना वस्तूस्थितीबाबत अवगत केले जावे. स्मशानभूमीच्या तक्रारीबाबत संबंधित विभागाकडून संपूर्ण माहिती घेण्यात येईल असे सांगून प्रभागातील अडचणी समजावून घेण्याकरीता आणि त्या सोडविण्याकरीता आढावा बैठक घेण्यात आली असून स्थापत्य, पाणीपुरवठा, विद्युत, नगररचना विभागांनी परस्परांच्या समन्वयाने लोकप्रतिनिधींच्या समस्या त्वरीत सोडविण्याबाबत महापौर माई ढोरे यांनी आदेश दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.