Chinchwad News : ‘पेव्हिंग ब्लॉक’चे काम आठ दिवसांत पूर्ण करा, अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर’ – संतोष सौंदणकर

एमपीसी न्यूज – चिंचवड गावातील रस्टन कॉलनीमध्ये ‘पेव्हिंग ब्लॉक’ बसविण्याचे काम अनेक दिवसांपासून अर्धवट अवस्थेत आहे. ट्रान्सफॉर्मर बॉक्सच्या सभोवती ब्लॉक बसवले नाहीत. विद्युत वाहिन्यांच्या असंख्य केबल उघड्या आहेत. रस्त्याच्या कडेने येता-जाता ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पुढील आठ दिवसात ही अर्धवट कामे पूर्ण करावीत. अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर देण्याचा इशारा चिंचवड विधानसभा संघटक संतोष सौंदणकर यांनी दिला आहे.

याबाबत पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात सौंदणकर यांनी म्हटले आहे की, चिंचवडगावातील रस्टन कॉलनीमध्ये सिमेंट रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले. रस्ते तयार झाल्यानंतर पालिकेने रस्त्यांच्या दोन्ही बांजुवर पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचे काम हाती घेतले. ठेकेदार बी. के. खोसे यांच्या नियंत्रणाखाली हे काम सुरू आहे. मात्र, गेली कित्येक दिवसांपासून हे काम अर्धवट स्थितीत आहे. काही ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक बसवले आहेत. तर, काही ठिकाणी ब्लॉक बसवले नाहीत. ड्रेनेज लाईन चेंबरच्या सभोवताली राऊंड मार्किंग केले नाही. त्याठिकाणचे काम अर्धवट ठेवून पुढील काम हाती घेतले आहे.

तसेच, विद्युत पथदिव्यांच्या खांबाभोवती खोदकाम करुन ठेवले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ट्रान्सफॉर्मर बॉक्सच्या सभोवती ब्लॉक बसवले नाहीत. विद्युत वाहिन्यांच्या असंख्य केबल उघड्या आहेत. त्यामुळे रस्त्याच्या कडेने येता-जाता ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. कासकामांसाठी पालिकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो. कामाचा दर्जा आणि पूर्ण केलेल्या कामाची टक्केवारी पाहून कोट्यवधी रुपयांची बिले अदा केली जातात. मात्र, प्रत्यक्ष कामाचा दर्जा पाहण्यासाठी अधिकारी त्याठिकाणी जाऊन पाहणी करत नाहीत.

‘क्युरी’ काढून संबंधित ठेकेदाराला जाब विचारला जात नाही. त्यामुळेच चिंचवड गावातील रस्टन कॉलनीमध्ये काम अर्धवट ठेवण्याची हिम्मत ठेकेदाराने केली आहे. ठेकेदार खोसे म्हणजे पालिकेचा जावई आहे का ? असा सवाल करत पुढील आठ दिवसांत ही अर्धवट कामे पूर्ण करावी. अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर देण्याचा इशारा सौंदणकर यांनी दिला आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.