Chinchwad News : स्मार्ट शहरातील स्मार्ट पोलिसांशी संपर्क साधा ‘स्मार्टपणे’

पिंपरी चिंचवड पोलिसांच्या विविध सोशल मीडिया पेजचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

एमपीसी न्यूज – पोलीस आणि नागरिक यांच्यातील सुसंवाद वाढण्यासाठी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट पोलिसांशी संपर्क साधून आपल्या शंका, तक्रारी आणि सूचना आता नागरिकांना पोलिसांपर्यंत पोहोचवता येणार आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने विविध सोशल मीडियासाईटवर आपले पेज सुरु केले असून त्याद्वारे आता पोलीस अधिक सक्रियतेने नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी या सोशल मीडिया साईटच्या पेजचे उदघाटन करण्यात आले. पिंपरी-चिंचवड शहर हे स्मार्ट सिटी म्हणून देखील ओळखले जाते. स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात विविध कामे देखील सुरु आहेत. सुरक्षेच्या, निगराणीच्या दृष्टीने असलेली कामे पोलिसांसोबत मिळून केली जात आहेत. त्यातच पिंपरी-चिंचवड पोलीस देखील आता स्मार्ट झाले आहेत.

शहर पोलीस दलातील सर्व पोलिसांना स्मार्ट वॉचचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. त्यामुळे पोलिसांच्या आरोग्याबाबतच्या सर्व सूचना आणि माहिती आता पोलीस नियंत्रण कक्षात समजणार आहेत. यामुळे वरिष्ठांना आपल्या कर्मचा-यांच्या आरोग्याची माहिती नियमितपणे मिळणार आहे.

लोकाभिमुख पोलीस प्रशासन होण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी थेट नागरिकांशी जाऊन संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. त्याला नागरिकांमधून चांगला प्रतिसाद येत आहे. नागरिकांच्या सूचना आणि तक्रारी आता थेट पोलीस आयुक्त स्वतः ऐकत आहेत, त्यामुळे इतर अधिकारी देखील मरगळ झटकून कामाला लागले आहेत.

अनेकजण सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांना देखील पिंपरी-चिंचवड पोलिसांसोबत जोडण्याचे काम पोलिसांनी केले आहे. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि युट्यूब या सोशल साईटवर पिंपरी-चिंचवड पोलिसांचे पेज सुरु करण्यात आले आहे. शुक्रवारी या सर्व पेजचा लोकार्पण सोहळा पार पडला. या सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील पोलीस नागरिकांपर्यंत पोहोचणार आहेत. स्मार्ट शहरातील स्मार्ट पोलिसांसोबत आता संवादही स्मार्ट पद्धतीने साधा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून करण्यात आले आहे.

फेसबुक – https://www.facebook.com/Pimpri-Chinchwad-Police-100558018722384
ट्विटर – www.twitter.com/pccity.police/
इन्स्टाग्राम – https://instagram.com/pccitypolice?igshid=1e6tbh5363xx2
युट्यूब – https://www.youtube.com/channel/UCiZXq7PlOW0oB0KruMw6HTg

‘सेवा’द्वारे पोलिसांचे पोलिसांवर नियंत्रण

अनेकदा पोलीस ठाण्यात तक्रारदारांना चुकीची वागणूक मिळत असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे नागरिकांच्या मनातील पोलिसांबद्दलचा द्वेष वाढतो. यावर उपाय करत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ‘सेवा’ हा उपक्रम सुरु केला आहे. यामध्ये तक्रारदार पोलीस ठाण्यात अथवा चौकीत कधी आला? त्याचे काय म्हणणे आहे? त्याची तक्रार पोलिसांनी ऐकून घेतली का? त्यासाठी त्याला किती वेळ वाट पाहावी लागली? पोलिसांनी दिलेल्या सेवेबद्दल तक्रारदार नागरिक समाधानी आहे का? अशा विविध मुद्द्यांवर आधारित हा उपक्रम आहे.

तक्रारदार पोलीस ठाण्यात गेल्यानंतर पोलीस तक्रारदाराची माहिती, तक्रार टॅबमध्ये सेव्ह करतील. ती माहिती नियंत्रण कक्षाला मिळेल. ठराविक कालावधीनंतर नियंत्रण कक्षातून संबंधित तक्रारदाराला संपर्क करून त्यांना आलेल्या अडचणी, पोलिसांचे सहकार्य याबाबत विचारले जाईल. त्यानुसार तक्रारदाराला मार्गदर्शन आणि आवश्यक असल्यास पोलीस दलात सुधारणा केल्या जातील.

या सेवा उपक्रमाची सुरुवात शुक्रवारी करण्यात आली. प्रातिनिधिक स्वरूपात चिखली, तळेगाव एमआयडीसी, दिघी, आळंदी आणि निगडी पोलिसांना टॅबचे वितरण करण्यात आले. पुढील काळात सर्व पोलीस ठाण्यात हा उपक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमातून पोलिसांची तत्परता तपासून पोलिसांच्या कामाच्या दर्जात सुधारणा करण्यात येणार आहे. ज्या पोलीस ठाण्यातील पोलीस तक्रारदारांना समाधानकारक सेवा देतील अशा उत्कृष्ठ पोलीस ठाण्यांचा गौरव देखील करण्यात येणार आहे.

‘एक्स ट्रॅकर’ ठेवणार सराईत गुन्हेगारांवर लक्ष

सराईत गुन्हेगारांवर पिंपरी चिंचवड पोलीस स्मार्ट पद्धतीने लक्ष ठेवणार आहेत. त्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून एक्स ट्रॅकर हे नवीन ॲप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. तडीपार केलेल्या गुन्हेगारांना त्यांचे रोजचे अपडेट या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून पोलिसांना द्यावे लागणार आहेत. तडीपार केलेल्या गुन्हेगाराला ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोडण्यात आले आहे, त्याने तिथून दररोज आपला फोटो आणि करंट लोकेशन पोलिसांना पाठवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

एखाद्या गुन्हेगाराला तडीपार केल्यानंतर त्याला जिल्ह्याच्या बाहेर त्याच्या सोयीच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोडले जाते. तिथल्या पोलीस ठाण्यात त्याची नोंद देखील केली जाते. मात्र, रोजच्या रोज त्याच्यावर पाळत ठेवणे पोलिसांना अशक्यप्राय होते. अनेक गुन्हेगार तडीपार केल्यानंतर काही दिवसातच शहराच्या हद्दीत फिरताना दिसतात. त्यामुळे त्यांच्यावर स्मार्ट पद्धतीने लक्ष ठेवण्यासाठी एक्स ट्रॅकर सुरु करण्यात आले आहे.

आरोपीला तडीपार केल्यानंतर त्याच्या मोबाईलमध्ये हे ॲप्लिकेशन पोलिसांकडून सुरु केले जाईल. त्यानंतर पोलीस दररोज त्याच्या भौगोलिक स्थानाबाबत चार ते पाच वेळेला चौकशी करतील. मोबाईल फोन शहराच्या बाहेर ठेऊन तो शहरात येऊ नये, यासाठी त्याला रोजच्या रोज आपला सेल्फी पोलिसांना पाठवावा लागेल.

सेल्फी पाठवताना त्याचे अक्षांश, रेखांश लोकेशन पोलिसांना समजेल. तसेच यात कुठल्याही प्रकारची छेडछाड करता येत नसल्याने गुन्हेगारांना आता स्मार्ट पद्धतीने आपली हजेरी द्यावी लागणार आहे. गुन्हेगाराने आपले भौगोलिक स्थान बदलले तर त्याची माहिती क्षणात पिंपरी-चिंचवड पोलीस नियंत्रण कक्ष, ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून त्याला तडीपार करण्यात आले आहे त्या पोलीस ठाण्याला आणि ज्या पोलीस ठाण्यात त्याला सोडण्यात आले आहे, त्या पोलिसांना त्याबाबत तात्काळ माहिती मिळणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.