Chinchwad News : पोलिसांनो ! सायकल गस्त पुन्हा सुरू करा; पोलीस आयुक्तांचे आदेश

एमपीसी न्यूज – पावसाळ्यात अडगळीला पडलेल्या पोलीस ठाण्यातील सायकल पुन्हा रस्त्यावर दिसणार आहेत. पावसाळ्यात सायकलवरून गस्त घालणे शक्य होत नसल्याने सायकल पेट्रोलिंग बंद झाली होती. ती आता पुन्हा सुरू होणार आहे. सायकल पेट्रोलिंग पुन्हा सुरू करण्याबाबत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आदेश दिले आहेत. गुरुवार (दि. 31) पासून पुन्हा सायकल गस्त सुरू झाली आहे.

पोलिसांची प्रकृती उत्तम राहावी यासाठी पोलीस आयुक्‍तांकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. पोलिसांच्या प्रकृतीची माहिती मिळावी यासाठी प्रत्येक पोलिसांला डिजिटल वॉच देण्यात आले आहे. या वॉचवरून पोलिसांचा रक्‍तदाब, ऑक्‍सिजनचे प्रमाण, ताप, ह्रदयाचे ठोके इत्यादीबाबत माहिती मिळते. तसेच याच घड्याळाचा वापर करीत पोलिसांच्या तंदुरूस्तीकरिता चालणे, धावणे, पोहणे, सायकलिंग आदि स्पर्धा आयोजित केल्या आहे. या स्पर्धेसाठी बक्षिसेही जाहीर केली आहेत.

 

पोलिसांनी वाहनांऐवजी सायकलवरून गस्त घालावी यासाठी पोलिसांना सायकलींचे वाटपही केले आहे. मात्र या सायकलला मडगार्ड नसल्याने पावसाळ्यात या सायकल पोलिसांनी अडगळीत ठेवून दिल्या. हिवाळ्यातही या सायकल गस्तीसाठी बाहेर काढल्या नाहीत. याबाबतची माहिती मिळाल्यावर पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश यांनी बिनतारी संदेशवरून सर्व पोलीस ठाण्यांना सायकलवरून गस्त घालण्याचे आदेश दिले.

सायंकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत दिवसपाळीतील कर्मचारी सायकलवरून गस्त घालतील. तसेच रात्रपाळीसाठी आलेले कर्मचारी आठ ते दहा वाजेपर्यंत गस्त घालतील. याशिवाय पहाटे चार ते सहा वाजताच्या दरम्यान पोलिसांचे ‘गुड मॉर्निंग’ पथकही सायकलवरून परिसरात गस्त घालतील, असे आदेश पोलीस आयुक्‍तांनी दिले.

 

यामुळे पहाटेच्यावेळी होणाऱ्या चोरीच्या घटनांना आळा बसेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला. तसेच ज्या पोलीस ठाण्यांकडून सायकलवरून गस्त घालण्यात येणार नाही त्यांच्याकडून खुलासा घेतला जाईल, असेही पोलीस आयुक्‍तांनी स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.