Chinchwad News : अंगारकी चतुर्थी निमित्त मोरया गोसावी मंदिर परिसरात जमावबंदीचे आदेश

एमपीसी न्यूज – अंगारकी चतुर्थीच्या दिवशी (दि. 2 मार्च, मंगळवार) चिंचवड येथील श्रीमन महासाधू मोरया गोसावी संजीवन समाधी मंदिर व मंगलमूर्ती वाडा येथे मोठ्या संख्येने भाविक भक्त दर्शनासाठी येतात. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर या परिसरात संचारबंदी व जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.

मंगळवारी (दि. 2 मार्च) मध्यरात्री बारापासून रात्री बारापर्यंत जमावबंदी आणि संचारबंदीचे आदेश लागू असणार आहेत. या कालावधीत नागरिकांनी परिसरात येऊ नये, तसेच मंदिर परिसरातील दुकानदार, हातगाडी, स्टॉलधारक यांनी आपले स्टॉल बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अंगारकी चतुर्थीच्या निमित्त मोरया गोसावी मंदिरात दर्शनासाठी लाखो भाविक भक्त येतात. यामुळे गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका असल्याने हे आदेश देण्यात आले आहेत. पडवळआळी, सुखकर्ता अपार्टमेंट चौक, जिजाऊ पर्यटन केंद्र, फकीराभाई पानसरे उर्दू शाळा चौक, मंगलमूर्ती वाडा परिसर, चिंतामणी गणेश मंदिर, मोरया यात्री निवास, मोरया प्रसाद हॉल समोरील रोड, श्री मोरया गोसावी समाधी मंदिर चिंचवडगाव परिसरात जमावबंदी व संचारबंदी लागू राहणार आहे.

देवस्थानच्या लोकांना या परिसरात प्रवेश असेल. मात्र, त्यांनी देवस्थान ट्रस्ट कडून देण्यात आलेले ओळखपत्र सोबत बाळगावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.