Chinchwad News : दुचाकीला कर्णकर्कश्श सायलेंसर लावणा-यांवर कारवाई करण्याची मागणी 

एमपीसी न्यूज – काहीजण जाणिवपूर्वक दुचाकीला कर्णकर्कश आवाज देणारे सायलेंसर लावतात. यामुळे रस्त्याने जाणारे वाहनचालक, वृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले यांना नाहक त्रास होतो. त्यामुळे अशा मोठ्या आवाजातील सायलेंसर लावणा-या वाहन चालकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

नाईक यांनी याबाबत पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, काही लोकांकडून बुलेट सारख्या दुचाकींना फटाक्यासारखा आवाज देणारे सायलेंसर बसवले जातात. शहरातील गल्ली, चौक, सिग्नल, बस थांबे आणि शाळा महाविद्यालयांच्या परिसरात ही मंडळी जाणीवपूर्वक घुटमळत असते.

रस्त्याने जाताना अचानक आलेल्या आवाजामुळे अपघात होण्याची देखील शक्यता आहे. रत्याच्या बाजूला असणा-या घरांमध्ये लहान मुले, वृद्ध नागरिक, रुग्णालयातील रुग्ण यांना देखील नाहक त्रास होतो. बेशिस्त वाहन चालकांमुळे ध्वनी प्रदूषण होते. एखाद्या व्यक्तीने अशा दुचाकीस्वारांना जाब विचारण्याचा प्रयत्न केल्यास जाब विचारणा-यावर हल्ला करण्यास देखील ही मंडळी घाबरत नाही.

अशा वाहन चालकांची वाहने जप्त करावी. वाहन परवाना रद्द करून मोठा आर्थिक दंड आकारावा. या आवाजामुळे अपघात होऊन जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर संबंधित व्यक्तीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असेही निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.