Chinchwad news: स्टेशन चौकातील फुटपाथवरील जाहिरात होर्डिंग हटविण्याची मागणी

एमपीसी न्यूज – चिंचवड स्टेशन चौकात महापुरूषांच्या पुतळ्याच्या नजिकच असलेल्या फुटपाथाच्या जागेवर उंच लोखंडी होर्डिंग्ज उभे करून त्यावर जाहिराती लावल्या जात आहेत. सध्या परतीच्या पाऊसाचा काळ आहे. वादळ अथवा चक्रीवादळामुळे होर्डिंग चुकून पडला,त्यात काही दुर्दैवी घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? पादचा-यांसाठी राखीव असलेल्या फुटपाथवर होर्डिंग्सला परवानगी दिलीच कशी जाते ?, असा सवाल करत ते होर्डिंग तत्काळ हटविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपक खैरनार यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लॉकडाउन जस जसे शिथिल होत आहे. तस तसे शहरातील अनेक ठिकाणी बेकायदा होर्डिंग्ज, बॅनरबाजीला पेव फुटले आहे. चिंचवड स्टेशन चौकात असणार्या आद्यक्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे आणि क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या अर्ध पुतळ्याच्या नजिक फुटपाथाच्या जागेवर उंच लोखंडी होर्डिंग उभा करण्यात आला आहे.

या चौकात सिग्नल असल्याने तेथे वाहनांची नेहमीचीच वर्दळ असते.या धोकादायक होर्डिंगमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. चिंचवडसह शहरातील फुटपाथवर उभारलेले होर्डिंग्स तात्काळ हटविण्यात यावेत,अशी मागणी दीपक खैरनार यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.