_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Chinchwad Corona News : कोरोना संकटात पूर्णानगरचा ‘विकास’ ठरतोय ‘देवदूत’ !

एमपीसीन्यूज : कोरोना महामारीच्या संकटकाळात माणूस माणसापासून दूर पळू लागला आहे. नव्हे माणुसकीचाही या संकटात बळी जातोय असे अनेक घटनांवरून पाहायला मिळत असताना चिंचवडच्या पूर्णानगर भागातील विकास गर्ग या सेवाभावी वृत्तीच्या तरुणाने परिसरातील नागरिकांना सर्व प्रकराची मदत केली आहे. कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड मिळवून देणे, प्लाझ्मा, सोसायट्यांचे निर्जंतुकीकरण, गरजू कोरोनाबाधितांसह बाहेरगावाहून उपचारासाठी शहरात आलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोफत जेवणाची सुविधा, अशा अनेक प्रकारची मदत करून विकास खऱ्या अर्थाने ‘देवदूत’ ठरला आहे.

विकास गर्ग हे चिंचवडच्या पूर्णानगर येथील सामाजिक कार्यकर्ते. मात्र, त्यांचे सेवाभावी कार्य एखाद्या लोकप्रतिनिधीला लाजवेल असेच. पूर्णानगर विकास कृती समितीच्या माध्यमातून ते परिसरातील विविध प्रश्न सोडवीत असतात. गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत आणि लॉकडाऊन काळात विकास यांनी मोठे समाजकार्य केले. या माध्यमातून त्यांनी पिंपरी चिंचवडकरांचे लक्ष वेधून घेतले.

सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही ते नागरिकांची दिवसरात्र सेवा करीत आहेत. कुणाला बेड मिळत नसल्यास बेड मिळवून देणे, प्लाझ्मा उपलब्ध करून देणे आदी कामांसाठी ते सदैव तत्पर असतात. दोन महिन्यापूर्वी पिंपरी चिंचवड शहरात प्लाझ्माचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यावेळी कोरोनातून बरे झालेल्या नागरिकांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे म्हणून ‘प्लाझ्मा दान करा 2100 रुपये मिळवा,’ हा उपक्रम राबविला हा खर्च त्यांनी स्वतः केला.

_MPC_DIR_MPU_II

या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. अवघ्या तीन दिवसांत 35 रुग्णांना प्लाझ्मा मिळवून देण्यात विकास यांना यश आले. त्यांच्या या उपक्रमाची महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनीही दखल घेत त्यांचे कौतुक केले होते. पुढे महापालिका प्रशासनानेही अशाच उपक्रम सुरु केला.

विकास गर्ग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोरोनाबाधित कुटुंब आणि बाहेरगावाहून शहरात उपचारासाठी आलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी तसेच गरजू नागरिकांसाठी दोन वेळचे मोफत जेवण पुरविण्याचे कार्य हाती घेतले आहे.यासाठी त्यांनी 9637777707  हा मोबाईल क्रमांक सोशल मीडियावर जाहीर केला आहे. दररोज जवळपास दीडशे ते दोनशे नागरिकांना ते जेवण पुरवीत आहेत.

विकास गर्ग यांच्या या निःस्वार्थी सेवाभावी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच त्यांचा या कार्याचा आदर्श घेऊन अनेक तरुणही आपापल्या परीने कोरोना रुग्ण, त्यांचे नातेवाईक व गरजू नागरिकांना मदत करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.