Chinchwad news: कोरोनाग्रस्त रुग्णांवरील उपचारात हलगर्जीपणा करू नका; महापौरांच्या सूचना

करोनाबाधित रुग्णांना दिलासा देण्याचे कामही डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांनी करावे अशा सुचनाही यावेळी देण्यात आल्या.

एमपीसी न्यूज – कोरोनाबाधित रुग्णांना वेळेत दाखल करून घेऊन उपचार मिळाले पाहिजेत. ऑटो क्‍लस्टर रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना सुविधा कमी पडू देवू नका, गोळ्या, औषधे, लॅब, ऑक्‍सिजन पुरवठा वेळेत उपलब्ध करुन देण्याच्या सूचना महापौर उषा ढोरे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

पिंपरी-चिंचवड पालिकेच्या वतीने ऑटो क्‍लस्टर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या 200 बेडच्या कोविड हॉस्पिटल आणि आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथील जम्बो रुग्णालयाची महापौर ढोरे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे यांनी पाहणी केली.

ऑटो क्‍लस्टर या ठिकाणी रुग्ण दाखल करण्यास सुरुवात झाली असून ऑक्‍सिजनची आवश्‍यकता असलेल्या 12 रुग्णांना येथे दाखल करुन घेण्यात आले.

शहरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव व रुग्णसंख्या लक्षात घेता रुग्णांसाठी वेळीच ऑक्‍सिजन बेड उपलब्ध व्हावे यासाठी पालिकेच्या वतीने ऑटो क्‍लस्टर येथे 50 आयसीयु आणि 150 ऑक्‍सीजन बेडचे कोविड हॉस्पिटल उभारण्यात आले आहे.

तसेच महाराष्ट्र शासनाकडून अण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे 816 बेडचे जम्बो रुग्णालय उभारण्यात आले आहे. या दोन्ही रुग्णालयांची आज महापालिका पदाधिकारी, अधिकारी यांनी पाहणी केली.

दाखल होणाऱ्या रुग्णांवर वेळीच उपचार व्हावेत व रुग्णांसाठी असलेल्या सुविधांमध्ये कुठल्याही प्रकारचा कामचुकारपणा होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी.

त्याचबरोबर गोळ्या, औषध, लॅब, ऑक्‍सिजन पुरवठा वेळेत उपलब्ध करुन देण्याबाबतचे सक्त आदेश संबधित प्रशासन व अतिरिक्त आयुक्त, महापालिकेचे नोडल अधिकारी सुनिल अलमलेकर यांना महापौरांनी दिले.

तसेच करोनाबाधित रुग्णांना दिलासा देण्याचे कामही डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांनी करावे अशा सुचनाही यावेळी देण्यात आल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.