Chinchwad News : देशाला स्वर्णयुगाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी उद्योजक निर्माण होणं गरजेचं – कृष्णप्रकाश

एमपीसी न्यूज – देशाला स्वर्णयुगाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी उद्योजक निर्माण होणं गरजेचं असल्याचं मत पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र व पुणे जिल्हा विकास केंद्र यांच्या सहकार्याने पोलिस पाल्यांसाठी आयोजित उद्योजकता परिचय कार्यशाळेत मार्गदर्शन करताना कृष्णप्रकाश बोलत होते.

यावेळी औरंगाबाद एमसीईडीचे कार्यकारी संचालक सुरेश लोंढे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रकाश रेंधाळकर, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त सागर कवडे, सिटिझन फोरमचे मुख्य समन्वयक तुषार शिंदे, महाराष्ट्र उद्योजकता केंद्राचे प्रशिक्षक, पोलिस कर्मचारी व त्यांचे पाल्य उपस्थित होते.

आयुक्त कृष्णप्रकाश पुढे म्हणाले, पोलिस कर्मचारी नेहमी जनसेवा आणि राष्ट्र सेवेत मग्न असतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या पाल्यांना अधिक वेळ देता येत नाही. उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून पोलिसांच्या पाल्यांना उद्योग सुरू करण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्य मिळणार आहे. पण फक्त मार्गदर्शन मिळाले म्हणजे उद्योग यशस्वी होईल असं नाही. त्यासाठी चिकाटीने मेहनत करावी लागेल. नेहमी कार्यतत्पर राहून उद्योग सिद्धिस घेऊन जाता येतो, असे कृष्णप्रकाश म्हणाले.

स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी कायम उद्यमशील रहायला हवं. ‘अब हवाएँ ही करेंगी रौशनी का फ़ैसला, जिस दिए में जान होगी वो दिया रह जाएगा’ हा शेर सांगून त्यांनी आपल म्हणणं पटवून दिले.

स्वप्न जागेपणी बघा आणि ती खरी करण्यासाठी भरपूर मेहनत घ्या. आपल्यातील उर्जेला योग्य दिशा द्या ती अनावश्यक आणि फालतू गोष्टींवर खर्च करु नका, असे आवाहन त्यांनी केले.

देशाला स्वर्णयुगाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी उद्योजक निर्माण होणं गरजेचं आहे. या उपक्रमांतर्गत अधिकाधिक उद्योजक निर्माण व्हावे यासाठी हा सगळा प्रपंच केला आहे. कार्यशाळेला मुलांच्या उपस्थितीचे त्यांनी विशेष कौतुक केले. नियोजन करून कार्यतत्पर होण्यावर जास्त भर देण्याचे आवाहन कृष्णप्रकाश यांनी पाल्यांना केले.

औरंगाबाद एमसीईडीचे कार्यकारी संचालक सुरेश लोंढे यांनी उद्योजकता प्रशिक्षण कार्यशाळेचा उद्देश, स्वरुप आणि गरज समजावून सांगितली. उद्योग क्षेत्राला आणि नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी शासन वेगवेगळ्या योजना राबवत असल्याचे ते म्हणाले.

‘एमएसएमई’ क्षेत्र हे कोणत्याही देशाची मोठी ताकद असते. युवा वर्गाकडे मोठी ऊर्जा आहे त्यांनी ती ऊर्जा मार्केटमध्ये वेगवेगळ्या संधी शोधण्यासाठी वापरली पाहिजे असेही ते म्हणाले. या उपक्रमाच्या माध्यमातून पोलिसांच्या पाल्यांना उद्योग विषयक प्रशिक्षण, बँकेकडून मिळणारं आर्थिक सहाय्य, शासनाच्या वेगवेगळ्या योजना आणि संबंधित विषयांचे तज्ञ यांच्याकडून मार्गदर्शन मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुलांना उद्योजक बनवण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक तो सर्व पाठिंबा आणि मार्गदर्शन आम्ही देऊ, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी कार्यशाळेची पार्श्वभूमी समजावून सांगितली. पोलिसांच्या मुलांनी सुद्धा उद्योजक झालं पाहिजे. या मार्गदर्शन कार्यशाळेच्या माध्यमातून त्यांना उद्योजक होण्याचा मार्ग उपलब्ध होईल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमचे मुख्य समन्वयक तुषार शिंदे यांनी या उपक्रमात सिटीझन फोरमचे असलेले योगदान आणि त्यांची भूमिका स्पष्ट केली.

सहाय्यक पोलीस आयुक्त सागर कवडे यांनी कार्यशाळेचे स्वरूप व त्याच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पोलिसांच्या पाल्यांना उद्योग निवडणे, उद्योजक मानसिकता, त्यासंबंधित आवश्यक मार्गदर्शन, प्रकल्प अहवाल, मार्केटिंग, कर्ज प्रस्ताव, शासकीय योजना, अनुभव कथन, प्रश्नउत्तरे व नाव नोंदणी या विषयावर मार्गदर्शन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाची सुरुवात पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून झाली. प्रास्ताविक सहाय्यक पोलीस आयुक्त सागर कवडे आणि रत्ना दहिवलकर यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.