Chinchwad News: कोरोना काळात खासगी रुग्णालयांकडून लूट – लक्ष्मण जगताप

एमपीसी न्यूज – कोरोना काळात पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील अनेक खासगी नॉन कोविड रुग्णालयांनी रुग्णांची आर्थिक लूट केली आहे. सरकारने निश्चित केलेल्या उपचार खर्चाव्यतिरिक्त रुग्णांकडून अवास्तव बिले वसूल करण्यात आल्याचा आरोप करत शहरातील सर्व खासगी नॉन कोविड रुग्णालयांनी वसूल केलेल्या बिलांचे ऑडिट करावे. जादा बिलांची सर्वसामान्यांना परतफेड करावी, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली आहे.

याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र पाठविले आहे. त्यात आमदार जगताप यांनी म्हटले आहे की, “कोरोना आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढल्यानंतर पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरातील बहुतांश खासगी रुग्णालयांना कोरोना रुग्णांवर उपचाराची परवानगी देण्यात आली. त्यानुसार अनेक रुग्णालयांनी आपल्या रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार सुरू केले. त्यावेळी सरकारने कोरोनासह इतर आजारांवरही रुग्णांकडून किती उपचार खर्च घ्यायचा, याचे आदेश काढले. त्यामध्ये कोरोनासह इतर सर्व आजारांवरील उपचार खर्चाचे दर निश्चित करण्यात आले आहेत.

सरकारच्या अधिसूचनेनुसारच रुग्णांना बिल आकारण्याचे सर्व खाजगी नॉन कोविड रूग्णालयांना आदेश देण्यात आले होते. परंतु, या आदेशाकडे पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील बहुतांश खासगी नॉन कोविड रुग्णालयांनी दुर्लक्ष केले. कोरोना आजाराव्यतिरिक्त इतर आजार झालेल्या रुग्णांकडून या नॉन कोविड रुग्णालयांनी मोठ्या रक्कमेची अवास्तव बिले आकरल्याचे निदर्शनास आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.