Chinchwad News : व्यावसायिकाची पावणेपाच कोटींची फसवणूक; पुणे व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांकडे तक्रार

एमपीसी न्यूज – व्यवसायासाठी एकाला पावणे पाच कोटी रुपये दिल्यानंतर संबंधित व्यक्तीने ते पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर पैसे देणार नाही, म्हणत धमकी दिली. याप्रकरणी एका व्यावसायिकाने आपली फसवणूक झाली असून संबंधित व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करून न्याय मिळवून देण्याची पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांकडे विनंती केली. याबाबत व्यावसायिकाने पोलीस आयुक्तांना लेखी निवेदन दिले आहे.

अनिकेश रमेश हजारे (रा. दापोडी, पिंपरी-चिंचवड) यांनी फसवणूक झाल्याबाबत पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आहे. स्वप्नील बालवडकर यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करून न्याय मिळवून देण्याची हजारे यांनी मागणी केली आहे.

तक्रारदार हजारे हे व्यावसायिक आहेत. एका व्यवहाराच्या माध्यमातून त्यांची स्वप्नील बालवडकर यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर बालवडकर यांनी त्यांना पैशांची गरज असल्याचे सांगून हजारे यांच्याकडे मदत मागितली. ओळखीतून निर्माण झालेला विश्वास आणि माणुसकीच्या नात्याने हजारे यांनी बालवडकर यांना 13 जुलै 2017 ते 1 जानेवारी 2018 या कालावधीत 4.75 कोटी रुपये दिले.

पैसे घेण्याच्या वेळी बालवडकर यांनी सर्व पैसे योग्य त्या रीतीने लवकरात लवकर देण्याचे आश्वासन दिले. 24 जानेवारी 2020 रोजी बालवडकर यांनी हजारे यांना लिहून दिले की, आपल्यामध्ये झालेले व्यवहार हे पूर्णपणे कायदेशीर आहेत. त्याबाबतचे शपथपत्र हजारे यांचे वकील कृष्ण पाटील यांच्या कार्यालयात लिहून दिले. 31 मार्च 2020 पर्यंत घेतलेले पैसे देणार असल्याचेही त्यावेळी सांगण्यात आले.

बालवडकर यांनी हजारे यांना एक धनादेश दिला. तो धनादेश 31 मार्च 2020 रोजीचा होता. त्या दिवशी बँकेत जाण्यापूर्वी बालवडकर यांनी हजारे यांना खात्यावर पैसे कमी असल्याने धनादेश बँकेत जमा न करण्यास सांगितले. त्यानंतर बालवडकर यांनी हजारे यांना फोनवरून सांगितले की, मी आपली रक्कम देत आहे. माझ्याकडून आपले झालेले नुकसान सुद्धा मी भरून देणार आहे.’ त्यानंतर हजारे यांना 19 जून 2020 रोजी तीन कोटी 50 लाख रुपयांचा धनादेश दिला.

बालवडकर हे आर्थिक फसवणूक करत असल्याचे लक्षात आल्याने हजारे यांनी बालवडकर यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. ‘तुला काय करायचे ते कर. मी कोणालाही घाबरत नाही. कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये जा. माझी कोणीही तक्रार घेणार नाही. माझ्या मागे खूप मोठे राजकीय नेते आहेत. माझे पूर्ण महाराष्ट्रात कोणीही वाकडे करू शकत नाही. मी खूप मोठ्या पक्षाचा कार्यकर्ता आहे’ अशी बालवडकर यांनी हजारे यांना धमकी दिली.

हजारे यांना बालवडकर यांच्याकडून आजवर चार कोटी 75 लाख रुपये येणे आहे. ती रक्कम हजारे यांना मिळावी, अशी मागणी हजारे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

या संदर्भात बालवडकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यांच्याशी संपर्क झाल्यानंतर त्यांची बाजू बातमीत समाविष्ट करण्यात येईल.

…अन्यथा आझाद मैदानावर आंदोलन करू – प्रदीप नाईक

व्यावसायिक अनिकेत हजारे यांची बाजू न्यायाची असून पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची तातडीने गंभीर दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी चालढकल केली तर नाईजास्तव तक्रारदारासह आपल्याला मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.