Chinchwad News : गजानन चिंचवडे, अश्विनी चिंचवडे यांच्याकडून राम मंदिरासाठी एक लाख 11 हजार आणि सव्वा किलो चांदीची वीट अर्पण

एमपीसी न्यूज – श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथील श्रीराम मंदिर निर्माण कार्यासाठी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून कै. बबन कृष्णाजी चिंचवडे पाटील, पोपट कृष्णाजी चिंचवडे पाटील यांच्या स्मरणार्थ शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे व नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांच्याकडून सव्वा किलो चांदीची वीट आणि एक लाख 11 हजार 111 रुपयांचा निधी देण्यात आला.

चांदीची वीट आणि धनादेश चिंचवडे यांनी आज (रविवारी, दि. 31) पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहअभियानप्रमुख मिलिंद देशपांडे यांच्याकडे सुपूर्त केला. यावेळी विभाग कार्यवाह मुकुंदराव कुलकर्णी, पिंपरी चिंचवड जिल्हा कार्यवाह विलास लांडगे, क्रांतिवीर चापेकर समितीचे सहकार्यवाह रविंद्र नामदे आदी उपस्थित होते.

देशभर राम मंदिरासाठी निधी संकलनाचे काम केले जात आहे. सर्व स्तरातील भक्त स्वेच्छेने आर्थिक देणगी आणि अन्य स्वरूपात मदत करीत आहेत. अयोध्या राम मंदिर निर्माण कार्यात गजानन चिंचवडे सुरुवातीपासून सक्रियपणे कार्यरत आहेत.

क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे सहकार्यवाह रवींद्र नामदे म्हणाले, “गजानन चिंचवडे आणि नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांनी 2018 साली नवरात्रोत्सवात अयोध्या येथील नियोजित राम मंदिर प्रतिकृती उभारली होती. त्यावेळी चिंचवडे यांनी राम मंदिराच्या कामासाठी सव्वा किलो चांदी वाहून खारीचा वाटा स्वरुपात मदत करणार असल्याचा संकल्प (नवस) सोडला. दोन वर्षानंतर त्या संकल्पाची पूर्तता करून त्यांनी आज आपली मदतरुपी सेवा प्रभू राम चरणी अर्पण केली आहे.

गजानन चिंचवडे राम मंदिर शिलान्यासाच्या वेळी अयोध्येत गेले होते. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत दोन वेळेला देखील ते अयोध्येत दर्शनासाठी गेले होते. प्रभू श्रीरामाचे ते परमभक्त आहेत, असेही नामदे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.