Chinchwad News : तरुणीचा पोलीस आयुक्तांना मेल अन पुढे घडले असे काही…

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या मेल व व्हॉट्सअपवर एका तरुणीचा मेसेज आला. त्यानंतर पोलिसांनी तरुणीचा शोधही घेतला. पण तरुणीचा शोध घेतल्यानंतर पोलीस चांगलेच चक्रावले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या ई-मेल व व्हॉट्सअप वर एका तरुणीचा संदेश आला. मजकुरामध्ये तरुणीने “मला काही मुलांकडून धमक्या मिळत आहेत व ते माझा लैंगीक छळ करत आहेत. मी या कृतीकडे सुरवातीला दुर्लक्ष केले, परंतु त्यांचे आणखी त्रास देणे वाढतच आहे. ते माझ्या जिवाला धोका पोहोचवू शकतात. मी परराज्यातील असून पुणे येथे शिक्षणाकरिता आली आहे. मला वेगवेगळ्या फोनवरून सारख्या धमक्या मिळत आहेत. माझे आई-वडील बाहेर आहेत व मी एकटी असून काय करावे हे मला सुचत नाही. मोबाईल नेटवर्क अडचणीमुळे मला संपर्क करण्यास मर्यादा येत आहेत.”

या संदेशाच्या अनुषंगाने आयुक्तांनी सामाजिक सुरक्षा पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांना तात्काळ दखल घेऊन तरुणीची मदत करण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्या. सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी सहाय्यक निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे, सागर पानमंद, उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे, धैर्यशील सोळंके पोलीस अंमलदार संतोष बर्गे, नितीन लोंढे, नागेश माळी, अतुल लोखंडे, संगीता जाधव, वैष्णवी गावडे यांची तरुणीचा शोध घेऊन मदतीसाठी टीम तयार केली.

संदेशातील मजकुराचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तरुणीशी ई-मेल व व्हॉट्सअप द्वारे संदेश पाठवून व कॉल करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र ती तरुणी पोलीस आयुक्त व पोलिसांना कॉल न करता लागोपाठ मिसकॉल करीत असे. पोलिसांनी तरुणीला कॉल केला असता तरुणी पोलिसांचा फोन उचलत नसे. यामुळे तरुणीकडून शोधकार्यास मदत होईल, अशी कोणतीही उपयुक्त माहिती उपलब्ध होत नव्हती.

टीमने तांत्रिक विश्लेषण करुन मुलींच्या आई-वडिलांपर्यंत संपर्क साधला असता, वेगळेच सत्य बाहेर आले. तरुणीच्या आई-वडिलांना व्हिडिओ कॉलद्वारे फोन करुन संपर्क साधण्यात आला असता, आई-वडिलांनी सांगितले की, आमची मुलगी ही पुणे येथे शिक्षण घेत नसून ती आमच्या सोबत राहते. ती सध्या मानसिक आजाराने त्रस्त असल्याने तिच्यावर औषध उपचार सुरू आहेत. तिने आपल्याकडे पाठविलेल्या ई-मेल मध्ये कोणतेही तथ्य नसून तिने मानसिक आजारातून आपल्याला ई-मेलद्वारे संदेश, व्हॉट्सअपवर संदेश पाठवून वारंवार मिसकॉल करीत होती. आम्ही आज मुलीसह नाशिक येथे देव दर्शनाकरिता जात आहोत. आमची व आमच्या मुलीची कोणतीही तक्रार नसल्याचे मुलीने व आई-वडिलांनी पोलिसांना सांगितले आहे. अशा प्रकारे आई-वडिलांशी झालेल्या संपर्कामुळे पोलिसांच्या शोध कार्यातून वेगळेच सत्य बाहेर आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.