Chinchwad News: पलटूराम सरकारने वर्षभरात महाराष्ट्र बंद पाडला-  देवेंद्र फडणवीस

 'विजेचा शॉक देणा-या सरकारला मतांचा शॉक देऊन जागे करा'

एमपीसी न्यूज – राज्य सरकार रोज नव्या घोषणा करते आणि घोषणेवरून मागे जाते.  वाढीव वीज बिले सुधरुन देऊ आणि बिलांमध्ये सवलत देखील देऊ, असे सांगितले. पण, त्यावरून पलटी मारली. अतिवृष्टीमुळे शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले. काल परवापर्यंत 50 हजार रुपये हेक्टरी आम्ही देऊ म्हणणारे एक नव्या पैशाची मदत कोणाला करत नाही. त्यामुळे या सरकारला ‘पलटूराम सरकार’ म्हटले पाहिजे. आश्वासन देतात आणि त्या आश्वासनावर कधीच टिकून राहत नाहीत. कुठलंही आश्वासन पाळत नाहीत. वर्षभरामध्ये पलटूराम सरकारने महाराष्ट्रातील चालू कामांना स्थगिती देऊन महाराष्ट्र स्थगित केला. बंद पाडला, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. विजेचा शॉक देणा-या सरकारला मतांचा शॉक देऊन जागे करा, असेही ते म्हणाले. 

पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजप उमेदवार संग्राम देशमुख आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार जितेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.  चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे आज (बुधवारी) झालेल्या मेळाव्याला महापौर उषा ढोरे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,  शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, महिला प्रदेशाध्यक्षा उमा खापरे,  विधानपरिषद आमदार निरंजन डावखरे, भाजप प्रदेश सचिव अमित गोरखे, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री रवी अनासपुरे,  सभागृह नेते नामदेव ढाके, सदाशिव खाडे, एकनाथ पवार, राजेश पिल्ले, आरपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे, विलास मडिगेरी, बाबू नायर, यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, कोरोना काळात भरमसाठ वीजबिले लोकांना आली. दोन खोल्यात राहणाऱ्यांना 30-30 हजारांची बिलं आली. महाराष्ट्राला न वापरलेल्या विजेची बिले दिली. त्यावर मंत्र्यांनी बिले सुधरुन देऊ आणि बिलांमध्ये सवलत देखील देऊ, असे सांगितले. त्यानंतर तीन मंत्र्यांनी सांगितले, निर्णय झाला आहे वीज बिलात सवलत देऊ . आता राज्याचे उर्जामंत्री म्हणाले, वीज वापरलीय तर पैसे भरावे लागतील. कोणाला एक पैशाची देखील सवलत मिळणार नाही.

विजेच्या शॉक देणाऱ्या सरकारला मतांचा शॉक देऊन जागे करा 
वापरलेल्या विजेचे पैसे निश्चित भरू पण तीनपटींपासून शंभरपटीपर्यंत बिले वाढीव लावली आहेत. वीज वापरलीच नाही. त्याची बिले कशी भरायची, असा सवाल करत ते म्हणाले,  चार दिवसांपूर्वी मंत्र्यांनी सांगितले. हो घोषणा केली होती. पण, माझा अभ्यास झाला नव्हता. हा कोणता अभ्यास करतात ते समजत नाही, असा टोलाही त्यांनी लगाविला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.