Chinchwad News: वीज बिल माफीच्या घोषणेवरून सरकारचे घुमजाव; भाजपचे आंदोलन

एमपीसी न्यूज – लॉकडाउनच्या काळातील वाढीव वीजबिलातील सूट देण्याच्या घोषणेवरुन घूमजाव करणा-या राज्य सरकार विरोधात भाजपने आंदोलन पुकारले आहे. भाजप प्रभाग क्रमांक 17 च्या वतीने बिजलीनगर येथील महावितरणच्या कार्यालयासमोर सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्या नेतृत्वाखाली आज (सोमवारी) आंदोलन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या दुटप्पी भुमिकेचा निषेध करण्यात आला.

लॉकडाऊनच्या काळात अनेक ग्राहकांना वाढीव वीज बिल रक्कम मोजावी लागली. त्यात कोरोना प्रादुर्भाव आजारामुळे सर्व नागरिकांची आर्थिक घडी विस्कटलेली आहे, असे असताना वीजबिलात सूट देण्याची घोषणा सरकारने केली आहे. मात्र त्यानंतर आता राज्यातील महाविकास आघाडी सरकारने वीज बिल माफीच्या घोषणेवरून घुमजाव करीत सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात वीजबिल पाठवून ती भरण्यासाठी सक्ती केली आहे.

सरकारची ही भूमिका ग्राहकांच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे. पिंपरी-चिंचवड शहर हे कामगारांचे शहर म्हणून ओळखले जाते. कोरोना प्रादुर्भाव असताना बहुतांशी कामगार आपली घरे बंद करून आपल्या मूळगावी गेली होती. त्यांच्या बंद असलेल्या घरात वीज पुरवठ्याचे हजारो रुपये वीजबिले आली आहेत. तसेच बंद व्यावसायिक-दुकानदार यांना सुध्दा लॉकडाऊन काळात मोठ्या प्रमाणात वीजबिले आली आहेत. तर, अनेक ठिकाणी मीटर तपासणी न करता ग्राहकांना मनस्ताप देणारे ॲवरेज बीले पाठविण्यात आली आहेत.

विजबिलात आकारणी केलेली रक्कम फार मोठ्या प्रमाणात असल्याने ती किमान कमी केली. तरी, नागरिकांना दिलासा मिळू शकतो, अशी भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. याबाबत वीज कंपनी आणि सरकारकडे मागणी करण्यात आली आहे. मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सरकारने तातडीने वीज ग्राहकांना वीजबिल माफी द्यावी, या मागणीसाठी आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केल्याचे ढाके यांनी सांगितले. आंदोलनानंतर शाखा अभियंता कल्याण जाधव यांना मागणीचे निवेदन देण्‍यात आले.

नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ, नगरसेविका करुणा चिंचवडे, संगीता भोंडवे, स्वीकृत प्रभाग सदस्य बिभीषण चौधरी, शेखर चिंचवडे, महिला मोर्चा मंडल अध्‍यक्षा पल्लवी वाल्हेकर, चिंचवड किवळे मंडल अध्यक्ष योगेश चिंचवडे, सरचिटणीस प्रदीप पटेल, अशोक बोडखे, रविंद्र ढाके, तेजस खेडेकर,‍ शिरीष कर्णिक, वसंत नारखेडे, संजय जगदाळे, सचिन वाणी, मुरलीधर चोपडे आदी आंदोलनात सहभाग झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.