Chinchwad News : महामानवाला घरातून अभिवादन करुन कोरोनाच्या लढ्यात प्रशासनाला सहकार्य करा – कृष्ण प्रकाश

एमपीसी न्यूज – महामानवाला घरातूनच अभिवादन करुन कोरोनाच्या लढ्यात प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले आहे.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची बुधवारी (दि. 14) 130 वी जयंती साजरी होत आहे. जयंती निमित्त दरवर्षी लाखो अनुयायी महामानवाला अभिवादन करण्यासाठी घराबाहेर पडतात. मात्र, यंदा देखील कोरोनाची लाट असल्याने शासनाने जयंती साजरी करण्यावर निर्बंध आणले आहेत. कोरोना संकटामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साधेपणाने साजरी करण्याबाबत गृह विभागाकडून निर्देश जारी करण्यात आले आहेत.

_MPC_DIR_MPU_II

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले की, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. बाबासाहेब हे अखंड भारताचे प्रेरणास्थान आहेत. त्यांची जयंती घराघरात साजरी होणे अपेक्षित आहे. मात्र, यंदा कोरोनामुळे देश वेगळ्याच संकटाशी सामना करण्यात व्यस्त आहे. त्यामुळे सर्वांनी आपल्या सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून प्रशासनास सहकार्य करणे गरजेचे आहे.

पोलिसांकडून अनुयायांना करण्यात आलेले आवाहन –

# रात्री बारा वाजता पुतळ्याजवळ कोणीही गर्दी करू नये
# सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत साधेपणाने जयंती साजरी करावी
# प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढू नये
# पुतळ्याला किंवा प्रतिमेला पुष्पहार घालताना पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये. तसेच, यावेळी कोरोनाचे सर्व नियम पाळावे
# चैत्यभूमी, दीक्षाभूमी येथे जाण्याचा प्रयत्न करू नये. येथील सर्व कार्यक्रम दूरदर्शनवर प्रसारित करण्यात येणार आहे.
# सार्वजनिक ठिकाणी गाणी, व्यख्याने, पथनाट्य यांचे आयोजन करू नये. ऑनलाईन कार्यक्रम घेण्यावर भर द्यावा.
# नियमांचे पालन करून रक्तदान यासारखे सामाजिक तथा आरोग्यविषयक उपक्रम घ्यावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.