Chinchwad News : बालकांच्या उर्जेला दिशा दिल्यास समाज गुन्हेगारीमुक्त : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश

संस्था, संघटनांनी पुढाकार घेण्याचे आवाहन

एमपीसीन्यूज : गुन्हेगारीकृत्य केलेल्या बालकांना समाजासोबत जोडायचे आहे. अशा मुलांना आयसोलेशनमध्ये ठेवण्याऐवजी त्यांची मानसिकता बदलायची आहे. त्यांच्यातील उर्जेला योग्य दिशा दिली पाहिजे. तरज समाज गुन्हेगारीमुक्त होण्यास मदत होईल. त्यासाठी शहरातील अशा बालकांचे सर्वेक्षण करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत. त्यासाठी शहरातील विविध घटक, संस्था, संघटना यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय, पिंपरी-चिंचवड सिटिजन फोरम व कनेक्टिंग एनजीओ यांच्या माध्यमातून ‘बालगुन्हेगारांचे पुनर्वसन’ या विषयावर चिंचवड येथील आटो क्लस्टर सभागृहात शनिवारी सायंकाळी चर्चासत्र झाले. या वेळी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश बोलत होते.

अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, मंचक इप्पर, आनंद भोईटे, गुरुकुल संस्थेचे गिरीश प्रभुणे, यशवंत मानखेडकर, महाराष्ट्र उद्योजकता केंद्राचे सुरेश लोंढे आदी या वेळी व्यावसपीठावर उपस्थित होते.

आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले की, पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील बहुतांश बालगुन्हेगार हे झोपडपट्टीतील आहेत. तेथील वातावरणातून विशिष्ट मानसिकता तयार होऊन बालवयातील मुले त्यांची नवीन सिस्टिम, पॅटर्न तयार करतात. चुकीची पद्धती अवलंबतात आणि गुन्हेगारीकृत्यांकडे वळतात.

अशा मुलांना गुन्हेगार म्हणून वागणूक दिली जाऊ नये. समाजासोबत जोडण्याची प्रक्रिया करायची आहे. तसेच १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर अशा मुलांचा सांभाळ करणे आवश्यक आहे. त्यांना रोजगार, राहण्याची व्यवस्था करून दिली पाहिजे. अशा युवकांना भरकटू न देता योग्य मार्ग दाखविणे महत्त्वाचे आहे. युवाशक्ती वरदान व अभिशापही आहे, ही बाब आपण लक्षात घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

उपलब्ध साधनांचा सदुपयोग व्हावा

आपल्याकडील उपलब्ध साधनांचा आपण राष्ट्र उभारणीसाठी उपयोग केला पाहिजे. युवाशक्ती आपले भवितव्य आहे. युवकांची व बालकांची मानसिकता समजून घेऊन त्यांच्यासाठी या साधनांचा उपयोग व्हावा. त्यातून ते देशाचे निर्माण करतील आणि आपले कार्य राष्ट्रासाठी आदर्श ठरेल, असा विश्वास कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केला.

पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, गिरीश प्रभुणे, पुणे येथील रिसोर्स सेल फॉर जुवेनाईल जस्टीसचे प्रकल्प अधिकारी जैद सय्यद, जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेच्या लीना राजन, पिंपरी-चिंचवड सिटिजन फोरमचे तुषार शिंदे, सागर लोंढे, गोविंद पानसरे यांनीही मनोगत व्यक्त केले.

सहायक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे यांनी प्रास्ताविक केले. अविनाश चिलेकर यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.