Chinchwad News: बिर्ला हॉस्पिटलमध्ये ‘एम्पॉवर’ मानसिक आरोग्य देखभाल केंद्राचे उद्घाटन

एमपीसी न्यूज – आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल, चिंचवड येथे सर्वांगीण मानसिक आरोग्य देखभाल केंद्राचे (एम्पॉवर सेंटर) आज (दि.15) एम्पॉवरच्या संस्थापिका व अध्यक्षा श्रीमती नीरजा बिर्ला व पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ऑनलाईन उपस्थिती लावली. एम्पॉवर या आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या साहाय्याने चालवण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांतर्गत हे सेंटर सुरू करण्यात आले आहे. 

यावेळी महापौर उषा ढोरे, आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलच्या सीईओ रेखा दुबे उपस्थितीत होत्या.

उद्घाटन प्रसंगी संस्थापिका व अध्यक्षा श्रीमती नीरजा बिर्ला म्हणाल्या, ‘आज भारतात 14 टक्क्यांहून जास्त व्यक्ती काही ना काही मानसिक आरोग्य समस्यांनी त्रस्त आहेत, यांची एकूण आकडेवारी जवळपास 20 कोटी इतकी जास्त आहे. महामारीमुळे या समस्येने अधिक जास्त गंभीर रूप धारण केले आहे, लॉकडाऊनच्या पहिल्या महिन्यातच मानसिक आरोग्य समस्यांनी त्रस्त व्यक्तींची संख्या 20 टक्क्यांनी वाढली. मानसिक आरोग्याची समस्या असलेल्यांपैकी 80 टक्के लोकांना वर्षभर काहीच उपचार मिळत नाहीत, रुग्ण आणि उपचारांमधील अंतर 83 टक्के इतके जास्त आहे.’

 

‘एम्पॉवरमध्ये आमचे प्राथमिक व सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट लोकांना त्यांच्या मानसिक आरोग्य समस्यांविषयी बोलते करण्यासाठी आणि समस्यांचे निवारण करण्यासाठी त्यांनी तज्ञांची मदत घेण्यात भिऊ नये यासाठी प्रोत्साहन देणे हे आहे. जास्तीत जास्त लोकांना सर्वसमावेशक मानसिक आरोग्य देखभाल सेवांचा लाभ मिळावा, मानसिक आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांचे निवारण करवून घेऊन सुखी व कार्यक्षम जीवन जगता यावे यावर एम्पॉवरच्या या पुणे सेंटरचा भर असणार आहे.’

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यामध्ये आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमध्ये एम्पॉवर सुरु होत असल्याबद्दल शुभेच्छा व एक विशेष संदेश पाठवला आहे. त्यांनी आपल्या संदेशात नमूद केले आहे, महाराष्ट्राचे आयटी हब असलेल्या पुण्यामध्ये एम्पॉवर – सेंटर सुरु केल्याबद्दल नीरजा बिर्ला, आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल आणि एम्पॉवरच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो. लोकांमध्ये, खास करून युवा पिढीमध्ये आढळून येणाऱ्या मानसिक आरोग्य समस्यांचे निवारण करण्यासाठी आणि त्यांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी उचलण्यात आलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे. बीएमसी एम्पॉवर हेल्पलाईन सुरु करणे असो किंवा मुंबई विमानतळावरील सीआयएसएफ अधिकाऱ्यांसाठी मानसिक आरोग्य उपक्रम चालवणे असो, एम्पॉवरने महाराष्ट्रभरात अतिशय कौतुकास्पद कामे केली आहेत. मी शहरभरातील लोकांना आवाहन करतो की त्यांनी आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमधील एम्पॉवरमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांचा लाभ घ्यावा.’

आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलच्या सीईओ रेखा दुबे म्हणाल्या, ‘आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमध्ये आम्ही परिपूर्ण आरोग्य देखभाल सेवासुविधा प्रदान करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. सुरुवातीपासून आम्ही शारीरिक उपचारांवर सर्वात जास्त भर दिला आहे. रुग्णांवर उपचार करत असताना आम्ही पाहतो आहोत की त्यांना बऱ्याच संघर्षांना सामोरे जावे लागत असते आणि त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर होतो. हॉस्पिटलमध्ये एम्पॉवर सेंटर सुरु करण्यात आल्यामुळे आम्ही आमच्या रुग्णांना सर्वसमावेशक मानसिक आरोग्य देखभाल पुरवू शकू.’

असे आहे एम्पॉवर सेंटर 

आदित्य बिर्ला मध्ये सुरु करण्यात आलेल्या एम्पॉवर सेंटरमध्ये मानसशास्त्रज्ञ, मानसोपचारतज्ञ, स्पीच थेरपीस्ट्स, ऑक्युपेशनल थेरपीस्ट्स, लहान मुले व वयस्क व्यक्तींचे मानसोपचारतज्ञ इत्यादींची संपूर्ण टीम उपलब्ध असून सुरक्षित व सहायक वातावरणात, समुपदेशन, थेरपी व उपचार पुरवले जातील. हे एम्पॉवर सेंटर 5 हजार चौरस फुटांचे असून याठिकाणी 8 कन्सल्टिंग रूम्स आणि 13 थेरपी रूम्स आहेत. याठिकाणी येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला आराम वाटावा असे आश्वासक वातावरण राखले गेले आहे, तसेच रुग्णांची संपूर्ण माहिती पूर्णपणे गोपनीय राखण्याची नीट काळजी देखील याठिकाणी घेतली जाईल.

एम्पॉवर मेंटल हेल्थ स्कोर सर्व्हे

पुणे सेंटर सुरु करण्यात आल्याच्या निमित्ताने एम्पॉवरने एम्पॉवर मेंटल हेल्थ स्कोअर सर्व्हे देखील सुरु केला आहे. हा ऑनलाईन सर्व्हे असून यासाठी फक्त पाच मिनिटे वेळ लागतो. व्यक्तीला स्वतः दिलेल्या उत्तरांच्या आधारे स्वतःच्या मानसिक आरोग्याविषयी मूलभूत समज मिळावी हा या सर्वेक्षणाचा उद्देश आहे. यातील प्रश्न दैनंदिन जीवन, वागणुकीच्या पद्धती, एकंदरीत जीवनशैली, सवयी इत्यादींशी संबंधित आहेत. हे सर्व प्रश्न तज्ञांनी तयार केले आहेत, लोकांना मानसिक आरोग्याविषयी मूलभूत माहिती मिळावी, मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि गरज निर्माण झाल्यास लोकांना तज्ञांची मदत घेता यावी यादृष्टीने या सर्व्हेची रचना करण्यात आली आहे.

सर्व्हेसाठी पुढील लिंकवर क्लिक करा

 http://mpowerminds.com/score

एम्पॉवरची सुरुवात 2016 साली करण्यात आली, तेव्हापासून आजतागायत मुंबई, कोलकाता आणि बंगलोर याठिकाणी एम्पॉवर सेंटर्स सुरु करण्यात आली आहेत. मुंबईमध्ये एम्पॉवर फाऊंडेशन आणि बिट्स पिलानी, बिट्स गोवा, बिट्स हैदराबाद व कल्याणमधील बिर्ला कॉलेजमध्ये एम्पॉवर सेल्स कार्यरत आहेत.

गेल्या दोन वर्षात पुण्यासह एकूण महाराष्ट्रात मानसिक आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या व्यक्तींची संख्या वाढत आहे. बीएमसी : एम्पॉवर 1:1 हेल्पलाईनकडून हाती आलेल्या माहितीनुसार एम्पॉवरच्या असे निदर्शनास आले आहे की, आरोग्याविषयीची चिंता, दुःख, व्यसने आणि ताणतणाव यांच्याशी संबंधित तब्बल 50 हजारपेक्षा जास्त कॉल्स महाराष्ट्रातून आले. मानसिक आरोग्य समस्यांचे निवारण करण्यासाठी तज्ञांची मदत घेण्याकडे लोकांचा कल वाढत असल्याचे यावरून दिसून येते. खास करून, पुण्यामध्ये, आयटी आणि स्टार्ट-अप हब म्हणूनही ओळखले जाणाऱ्या या शहरामध्ये काम व खाजगी जीवनातील असंतुलन, एकाच वेळी अनेक कामे करावे लागण्याचे ओझे आणि जागतिक आर्थिक परिस्थितीचा तणाव यामुळे मानसिक चिंता सहन कराव्या लागणारे लोक अनेक आहेत, ज्यामुळे सर्वांगीण मानसिक आरोग्य सेवा केंद्राची गरज वाढत आहे. समाजात निर्माण होत असलेली ही गरज पूर्ण करण्याचे काम पुण्यातील एम्पॉवर सेंटर करेल. एम्पॉवर सेंटर सुरु झाल्यामुळे पुणे व आजूबाजूच्या भागांतील रहिवाशांना दर्जेदार मानसिक आरोग्य देखभाल सेवा पुरवल्या जाऊ शकतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.