Chinchwad News: पवना नदीच्या पाणी पातळीत वाढ; श्री मोरया गोसावी संजीवन समाधी मंदिराचा काही भाग पाण्यात

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडसह मावळात पावसाचा जोर वाढल्याने पवना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. त्यामुळे चिंचवडगावातील श्री मोरया गोसावी संजीवन समाधी मंदिरात पाणी शिरले. मंदिराचा काही भाग पाण्यात बुडाला आहे. पवना धरण सुमारे 60 टक्के भरले असून धरणातून अजून कोणत्याही प्रकारे पाण्याचा विसर्ग सुरू झालेला नाही. केवळ पावसाचे पाणी आहे.

काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने हजेरी लावली आहे. रविवारपासून पाऊस पडत आहे. मावळात धुवांधार पाऊस पडत आहे. त्यामुळे नदी, नाले, ओढे ओसांडून वाहू लागले आहेत. मावळात पावसाचा जोर वाढल्याने पवना नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. त्यामुळे चिंचवडगावातील श्री मोरया गोसावी संजीवन समाधी मंदीरातही पाणी शिरले आहे. मंदिराचा अर्धा भाग पाण्यात बुडाला आहे.

काही ठिकाणी नदीच्या काठच्या नागरिकांचे स्थलांतर करावे लागले. पिंपरीतील आंबेडकर कॉलनीतील खालच्या घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे तेथील नागरिकांना बौद्ध विहारात स्थलांतरित केले. शहरातही पावसाचा जोर कायम आहे. शहरातील रस्ते जलमय झाले आहेत. शहराच्या विविध भागात पाणीच पाणी झाले आहे. पाण्याच्या पातळीत जोरदार वाढ झाली आहे.

…तर आर्मी, एनडीआरएफची मदत घेणार !

पवना नदी पात्रातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. सकाळपेक्षा आत्ता पाणी कमी आहे. नदीकाठी असलेल्या पिंपरीतील आंबेडकर कॉलनीतील खालच्या घरांना पाणी लागले होते. तेथील नागरिकांची बौद्ध विहारात व्यवस्था केली. सांगवी मुळानगरलाही महापालिकेचे अधिकारी जावून आले. शहरात कोठे पाणी साचून राहिलेले नाही.

एमआयडीसीत एका ठिकाणी झाड पडले होते. उद्यान विभागाने ते झाड तत्काळ हटविले. महापालिकेचा अग्निशामक सज्ज आहे. महापालिकेचे अधिकारी आर्मी, एनडीआरएफच्याही संपर्कात आहोत. आवश्यकता भासल्यास त्यांची मदत घेतली जाणार असल्याचे महापालिका अधिका-यांनी कळविले.

पवना धरणातून पाण्याचा विसर्ग नाही – तांबोळी

पवना धरणाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अन्वर तांबोळी म्हणाले, ”पवना धरण परिसरात पावसाचा जोर आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. 1 जून पासून धरण परिसरात 1219 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. सकाळी 55 टक्के पाणीसाठा होता. दिवसभरात त्यात 6 टक्क्यांनी वाढ झाली. सायंकाळी 60.74 टक्के पाणीसाठा झाला. सकाळपासून 89 मिली मीटर पाऊस झाला आहे. सकाळपर्यंत धरणातील पाणीसाठा 70 टक्के होईल. धरणातून अद्याप पाण्याचा विसर्ग सुरु केला नाही. धरणातील पाणीसाठा 95 टक्क्यांच्या पुढे गेल्यानंतर पाण्याचा विसर्ग करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.