Chinchwad News: पालकांनी घेतली आरटीई प्रवेश प्रक्रियेची माहिती

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र शासनाच्या सर्व शिक्षा अभियान अंतर्गत वंचित व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा अधिकार या आरटीईची प्रवेश प्रक्रिया 9 तारखेपासुन सुरू होत आहे. त्याअनुषंगाने या घटकातील विद्यार्थी पालकांच्या विविध प्रश्नांची उत्तरे व अडीअडचणी दूर होण्यासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्यावतीने RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकांनी प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती घेतली.

या उपक्रमात पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. शिक्षण विभागाच्या ‍अधिकारी व शिक्षकांसोबत प्रश्नोत्तर या सत्रात सहभाग घेवून आपल्या प्रश्नांचे निरसन केले. यावेळी महापालिका शिक्षण मंडळाचे सहायक प्रशासन अधिकारी पराग मुंडे, पर्यवेक्षक विलास पाटील, राम लेंबे यांनी शासनाचे बदललेले निकष व आदेशांवर माहिती दिली.

सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, याप्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असलेला तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला त्वरीत मिळावा. पालकांना मदत व्हावी, या हेतूने आयोजित केलेला ‘तहसील आपल्या दारी’ हा उपक्रम 12 व 13 फेब्रुवारीला आहे. या उपक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा.

तसेच आरटीई प्रवेश प्रक्रियेसंदर्भात काही अडचणी असल्याने कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी भाजपा चिंचवड-किवळे मंडल सरचिटणीस प्रदीप पटेल, कामगार आघाडी उपाध्यक्ष शंकर पाटील, प्रभाग अध्यक्ष भगवान निकम, ओबीसी आघाडी सरचिटणीस कैलास रोटे, योगेश महाजन, माऊली जगताप उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.