Chinchwad News: मोहननगर येथील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याच्या कामाची सखोल चौकशी करा- भापकर

एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजी महाराज स्वागत कमान मोहननगर ते मेहता हॉस्पिटल काळभोरनगर दरम्यान सुरू असणाऱ्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याच्या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी पालिकेकडे केली आहे. या रस्त्यावर होत असलेला खर्च अवास्तव वाटतो. त्यामुळे या कामाची सर्व बिले थांबविण्यात यावीत, अशीही त्यांनी केली.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले आहे. त्यात भापकर यांनी म्हटले आहे की, महापालिकेच्या वतीने मोहननगर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्वागत कमान ते मेहता हॉस्पिटल काळभोरनगर दरम्यानच्या डीपी रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या 14 कोटी 85 लाख 84 हजार रुपयांच्या कामाचे आदेश मे. इंगवले पाटील कन्स्ट्रक्शन कंपनी यांना 17 जुलै 2019 रोजी दिले आहेत. या कामाची मुदत 24 महिने म्हणजे 16 जुलै 21 पर्यंत होती. मात्र हे काम या मुदतीत केवळ 60% ते 65% झाले होते. सुरुवाती पासूनच कन्स्ट्रक्शन कंपनीने कामात हलगर्जीपणा व मनमानी पद्धतीने काम केले. यामध्ये प्रकल्पाची माहिती असणारा फलक,दिशादर्शक फलक न लावल्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागला.

या कामाचे आदेश झाल्यानंतर हे काम होत असताना प्रत्यक्ष निविदा करारनाम्यानुसार काम करण्याऐवजी, अधिकारी, ठेकेदार व सल्लागार यांनी संगनमत करून नगरसेवकांना ‘मॅनेज’ करुन या ठेकेदाराने निविदा अटी-शर्तीचे उल्लंघन केले. शॉर्टकट मारून महापालिकेला गंडवण्याचा प्रयत्न केला. मोजमाप पुस्तिकेत धरलेली खोदाई व प्रत्येक्ष जागेवर झालेली खोदाई याची सखोल चौकशी करावी. रस्त्याच्या चेंबर बांधणी कामी वापरलेली स्टील व प्रत्यक्ष मोजमापानुसार प्रत्येक चेंबरची लांबी, रुंदी व उंची तपासण्यात यावी.

त्याच बरोबर सदर चेंबरसाठी आरसीसी भिंतीची भराई मोजण्यात यावी. यासाठी एकूण वापरण्यात आल्याने स्टील व प्रत्येक्ष झालेले काम याचा अंदाज घेऊन प्रत्येक्ष त्यासाठी केलेल्या खर्च याची तपासणी व्हावी.या काँक्रिट रस्ता त्याची एकूण लांबी व या रस्त्यावर होत असलेला खर्च अवास्तव वाटतो. त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण सखोल चौकशी व्हावी. सर्व बिले थांबविण्यात यावीत, अशी मागणी भापकर यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.