Chinchwad News : क्रांतिवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालय भूमिपूजनाच्या अडीच वर्षांनंतरही कामाच्या प्रतीक्षेत

पालिका प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार; कामाला गती न मिळाल्यास आंदोलनाचा अश्विनी चिंचवडे यांचा इशारा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराची अस्मिता आणि श्रद्धास्थान असलेलया क्रांतिवीर चापेकर  राष्ट्रीय  संग्रहालयाचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. मात्र, पालिका प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार आणि अक्षम्य दुर्लक्षपणामुळे राष्ट्रीय संग्रहालय अडीच वर्षानंतर देखील कामाच्या प्रतीक्षेतच आहे.

दरम्यान, पालिका आयुक्तांना क्रांतिवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालयाचे काम करायचे आहे, याची आठवण करून देण्यासाठी नगरसेविका अश्विनी चिंचवडे आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी नामी शक्कल लढवली. पालिका प्रशासन ज्या क्रांतिवीरांच्या राष्ट्रीय संग्रहालयाचे काम करण्यास विसरले आहे, त्याच क्रांतिवीर चापेकर यांचे स्मृतिचिन्ह देऊन चिंचवडे यांनी पालिका आयुक्तांचा सत्कार केला. तसेच त्यांना क्रांतिवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालयाचे काम करण्याची आठवण करून दिली.

नगरसेविका अश्विनी चिंचवडे म्हणाल्या, ‘क्रांतिवीर चापेकर वाड्याच्या तिसऱ्या टप्प्याचे काम करणे’ हे लेखाशिर्ष निर्माण करून क्रांतिवीर चापेकर चौकातील समूहशिल्पाचे काम संपल्यानंतर पुढील वर्षी क्रांतिवीर चापेकरवाडा परिसराचे काम करायचे; असे तत्कालीन आयुक्त राजीव जाधव, शहर अभियंता एम. टी. कांबळे आणि तत्कालीन लोकप्रतिनिधी यांच्या बैठकीत ठरले होते.

त्यानंतरच्या कालावधीत श्रावण हर्डीकर यांची पालिका आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर या कामाला गती येईल, अशी भाबडी आशा पिंपरी-चिंचवडकरांना होती.

राष्ट्रीय संग्रहालयासाठी 12 कोटी रुपयांची अंदाजपत्रकीय प्रशासकीय मान्यता देखील मिळाली. असे असताना मागील अडीच वर्षांच्या काळात पालिकेने केवळ 48 लाख 98 हजार रुपयांची निविदा काढून शुभारंभाचा भव्य कार्यक्रम आटोपला.

_MPC_DIR_MPU_II

क्रांतिवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालयाच्या इमारतीचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 23 जुलै 2018 रोजी झाले. उद्घाटनाचा दिमाखदार सोहळा पार पडला. भूमिपूजन केल्यानंतर संग्रहालयाच्या कामाचा मात्र प्रशासनाला विसर पडला.

राष्ट्रीय संग्रहालयाच्या कामामध्ये येणाऱ्या अडचणी लक्षात घेता स्थानिक लोकप्रतिनिधी, स्मारक समितीचे पदाधिकारी आणि अधिकारी यांची प्रत्येक महिन्याला बैठक घेऊन कामातील प्रगतीचा आढावा घेणे आवश्यक होते. परंतु, आयुक्तांसह पालिका प्रशासनाने संग्रहालयाच्या कामाकडे अक्षम्य असे दुर्लक्ष केले. त्याचाच परिपाक म्हणून राष्ट्रीय संग्रहालयाचे काम अजूनही कागदावरच धूळ खात पडले आहे.

महापालिकेचे जबाबदार अधिकारी जर-तरच्या वल्गना करत बांधकाम परवानगी, पार्किंग समस्या, एस्टीमेट, निविदा कोणी काढायची, कशी काढायची याबाबत अजूनही कागदोपत्री निश्चित अंतिम धोरण ठरले नसल्याचे सांगतात. क्रांतिवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालयाच्या कामामध्ये झालेल्या या दप्तर दिरंगाईला कोण जबाबदार आहे, हे काम का रखडले आहे, असा जाब विचारत चिंचवडे यांनी या कामाशी संबंधित सर्वांची चौकशी करण्याची मागणी केली.

पिंपरी-चिंचवड शहराची अस्मिता, श्रद्धास्थान असणारे क्रांतिवीर चापेकर यांच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या कामाचे भूमिपूजन खुद्द मुख्यमंत्री करतात. त्याच कामाची दोन वर्षानंतर प्रगती शून्यच राहते.

हे बेजबाबदारपणा, अकार्यक्षम, नियोजनशून्य प्रशासकीय कारभाराचे लक्षण आहे. ब क्षेत्रीय कार्यालयातील स्थापत्य विभाग आणि स्थापत्य विषयक विकासकामांचे ऑडिट करावे. या कामाबाबत योग्य ती कार्यवाही करून कामाला गती न दिल्यास शहरात सर्वपक्षीय तीव्र आंदोलन करणार असल्याचेही चिंचवडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.