Chinchwad News : नागरिकांच्या अल्प प्रतिसादात पोलीस आयुक्तांच्या ‘टॉक टू कॉप्स’ मोहिमेचा शुभारंभ

एमपीसी न्यूज – पोलिसांची कर्तव्ये सांगण्यासाठी तसेच नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी ‘टॉक टू कॉप्स’ ही मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेत प्रत्येक आठवड्यातील एका दिवशी शहरातील एका भागात जाऊन तिथल्या नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे. ‘टॉक टू कॉप्स’ मोहिमेचा शुभारंभ नागरिकांच्या अल्प प्रतिसादात चिंचवडमधून बुधवारी (दि. 30) झाला.

चिंचवड येथील नागरिकांसोबतच्या बैठकीत नागरिकांनी त्यांच्या समस्या पोलीस आयुक्तांसमोर मांडल्या. यावेळी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यासह पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे आदी उपस्थित होते.

पोलिसांची कमी होत असलेली विश्वासार्हता, पोलीस ठाण्यांसोबत पोलीस चौक्या देखील डिजिटल कराव्यात, शहरातील गुन्हेगारी, शहर पोलिसांचे मनुष्यबळ, पदपथांवरील पार्किंग यासह अन्य अनेक विषयांवर यावेळी चर्चा झाली.

पोलीस स्टेशन डिजिटल केली जात आहेत. त्याच्या सोबत चौक्या देखील डिजिटल कराव्यात. ज्यामुळे नागरिकांना पोलीस स्टेशनला न जाता जवळच्या चौकीत जाता येईल, त्यांची डिजिटली तक्रार  तत्काळ पोलिसांकडे पोहोचवता येईल, असा मुद्दा माधुरी कवी यांनी उपस्थित केला.

पोलीस स्टेशन डिजिटल होत आहेत. त्यासोबतच पोलीस चौक्या देखील डिजिटल व्हायला हव्यात, हा मुद्दा रास्त आहे. पुढील सहा महिन्यात पोलीस चौक्या देखील डिजिटल करण्याचा प्रयत्न करू. सर्व चौक्या मोबईल अपद्वारे जोडल्या जातील.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय सोशल मिडीयावरील हवे तेवढे सक्रीय नाही. सोशल मिडीयाच्या माध्यमातून नागरिकांना जोडून घेण्याचा देखील प्रयत्न केला जाईल, असे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.

शहरातील गुन्हेगारी घटनांमध्ये तरुणांचा सहभाग आणि तरुणांमधील वाढती गुन्हेगारी याबाबत सुप्रिया सबनीस यांनी विचारले. त्यावर आयुक्तांनी उत्तर दिले, “पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून याबाबत सकारात्मक काम केले जात आहे. अल्पवयीन मुले अजाणतेपणाने गुन्हेगारी घटनांकडे आकर्षिली जातात. तीच अवस्था इतर तरुणांची देखील आहे.

पोलिसांकडून अल्पवयीन मुले आणि तरुणांचे सर्वेक्षण करून त्यांना योग्य दिशा देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. गुन्हेगारीकडे जाणते-अजाणतेपणाने ओढल्या गेलेल्या तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तसेच त्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देण्यासाठी एक अभिनव उपक्रम पोलिसांनी हाती घेतला आहे.

नगरसेवक सुरेश भोईर यांनी पदपथांवर होणारी पार्किंग आणि बीआरटी मार्गावर लावली जाणारी वाहने याबाबत मुद्दा उपस्थित केला. त्यावर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

पोलीस कर्तव्यावर असताना दारू पितात, तर अशा वेळी नागरिकांनी काय करायला हवे. असा प्रश्न रेखा क्षीरसागर यांनी विचारला. त्यावर उत्तर देताना आयुक्त म्हणाले, “याबाबत वरिष्ठ पोलीस अधिका-यांना माहिती द्या. त्याची चौकशी करून तत्काळ योग्य  ती कठोर कारवाई केली जाईल.”

आयुक्तांनी सुरु केलेल्या या मोहिमेला चिंचवड मधून सुरुवात झाली आहे. ‘टॉक टू कॉप्स’ कार्यक्रमाची वेळ दुपारी पाच वाजता ठरवण्यात आली होती.

मात्र, वेळ होऊन गेल्यानंतर देखील नागरिकांचा प्रतिसाद अतिशय कमी होता. त्यामुळे कार्यक्रम सुरु होण्यासाठी नियोजित वेळेपेक्षा सुमारे दीड तास उशीर झाला. दीड तासानंतर देखील नागरिकांची उपस्थिती कमीच होती.

मात्र, या बैठकीत नागरिकांच्या मनातील शंका, प्रश्न त्यावर पोलीस आयुक्तांची उत्तरे असा दुहेरी संवाद पुढे बराच वेळ चालला. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या कार्यशैलीचे नागरिकांनी स्तुतीसुमनांनी कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.