Chinchwad news: मंगलमूर्ती वाडा, चापेकर शिल्पसमूह, मोरया गोसावी मंदिर परिसराचे होणार सुशोभिकरण; 9 कोटींच्या खर्चाला मंजुरी

0

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका चिंचवड येथील मंगलमूर्ती वाडा, चापेकर शिल्पसमूह, मोरया गोसावी मंदिर पासून ते थेरगाव बोटक्लब पर्यंतच्या परिसराचे सुशोभिकरण करणार आहे. त्यासाठी येणाऱ्या सुमारे 9 कोटी 1 लाख रुपयांच्या खर्चासह शहरातील विविध विकासकामांसाठी येणाऱ्या 15 कोटी 23 लाख रूपयांच्या खर्चास समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

स्थायी समिती सभागृहात झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते. पवना धरणातून से.क्र.23 जलशुध्दीकरण केंद्र निगडीपर्यंत पाणी आणण्यासाठी थेट पाईपलाईन टाकण्याच्या प्रकल्पासाठी सल्लागार नेमणूकीला मान्यता देण्यात आली.

तसेच मलनि:सारण नलिका मॅनहोल चेंबर्सची सफाई आधुनिक यांत्रिकी पध्दतीने करण्यासाठी येणार्‍या सुमारे 1 कोटी 29 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

सुरक्षा विभागामार्फत ठेकेदारी पध्दतीने सुरक्षा व्यवस्था या उपक्रमान्वये सुरक्षा व्यवस्था करण्यासाठी 55 लाख, मनपाचे विविध विभागास आवश्यक छपाई साहित्य खरेदीसाठी सुमारे 1 कोटी 22 लाख 25 हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

त्याचबरोबर शहर झोपडपट्टी पुनर्वसन अंतर्गत मिलिंदनगर येथील प्रकल्पामधील इमारतीच्या दुरुस्तीची कामे करण्यासाठी सुमारे 2 कोटी 27 लाख 38 हजार रुपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.