Chinchwad News : सेंट्रल वर्क डिपार्टमेंटमध्ये उच्च पदावर कार्यरत असल्याचे भासवून 255 महिलांची कोट्यावधींची फसवणूक; दोन ठगांना बेंगलोर मधून अटक

एमपीसी न्यूज – सेंट्रल वर्क डिपार्टमेंटमध्ये उच्च पदावर आणि केंद्र शासनाच्या ऍग्रीकल्चर विभागात उच्च पदावर काम करत असल्याचे भासवून दोन ठगांनी पुणे, बेंगलोर आणि गुरगाव येथील तब्बल 255 महिलांशी मेट्रोमोनियल साईटवरून संपर्क केला. महिलांकडून वेगवेगळ्या कारणांसाठी पैशांची मागणी करून त्यांची आर्थिक फसवणूक केली. तसेच काही महिलांचा लैंगिक छळ केला. नाव बदलून राहणाऱ्या या दोन ठगांना वाकड पोलिसांनी बेंगलोर मधून अटक केली.

निशांत रमेशचंद नंदवाना (वय 33, रा. किशनगंज, बांरा, राजस्थान), विशाल हर्षद शर्मा (वय 33, रा. कोटा राजस्थान. दोघे सध्या रा. शोभा पॅलेडीयन, मराठाहल्ली, बेंगलोर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

दोन महिलांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली की, मोठ्या पदावर काम करणाऱ्या व्यक्तींनी त्यांची शारीरिक शोषण करून आर्थिक फसवणूक केली आहे. त्यानुसार वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्या महीलेस जीवनसाथी या मॅट्रिमोनियल साईटवरुन एका इसमाने त्याचे प्रोफाईल पाठवून तिला महागड्या गाडीतून येवून भेटून तिच्याशी ओळख वाढवली. महिलेला फिरायला नेऊन तिला सेन्ट्रल पब्लिक वर्क डिपार्टमेंट मध्ये चिफ प्रोजेक्ट मॅनेजर असल्याचे सांगून आरोपीने लग्नाचे अमीष दाखविले. त्यानंतर त्याला एका प्रोजेक्टसाठी 60 लाख रुपयांची गरज असल्याचे महिलेला सांगितले. महीलेकडून 13 लाख रुपये विश्वासघाताने घेऊन महीलेची केली.

दुसऱ्या एका प्रकरणामध्ये वरील गुन्हयातील आरोपीबरोबर राहणा-या इसमाने वरील दोघीपैकी दुसऱ्या मुलीबरोबर अशाच प्रकारे तो केंद्र शासनाच्या अॅग्रीकल्चर विभागामध्ये डेप्युटी डायरेक्टर पदावर कार्यरत असल्याचे सांगून ओळख वाढवली. तिला लग्नाचे अमीष दाखवून तिला महागड्या कंपास जीपमध्ये फिरायला नेले. महिलेसोबत जीपमध्येच शाररिक संबंध ठेवण्यास भाग पाडले व तिच्याकडून व्यवसायाचे कारण सांगून पाच लाख रुपये घेत तिची फसवणुक करुन पसार झाला. याबाबत देखील वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

स्वीगी बॉय बनून पोलिसांनी ठेवली पाळत

या गुन्हयातील दोन्ही आरोपी यांनी बाणेर भागात आलिशान फ्लॅटमध्ये राहून अनेक मुलींना फसवले असण्याची शक्यता पोलिसांना वाटली. त्याबाबत पोलिसांनी तात्काळ तांत्रिक व इतर माहीती काढून वाकड पोलिसांची एक टीम बेंगलोर येथे गेली. वाकड पोलिसांनी बेंगलोर येथे संशयित आरोपींच्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये स्वीगी बॉय म्हणून पाळत ठेवली. आरोपींची खात्री होताच पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. दोन्ही आरोपी एकत्रीतरित्या अलिशान पलॅटमध्ये अभव कश्यप व अथर्वन तिवारी या वेगवेगळ्या बनावट नावाने राहत होते. त्यासाठी त्यांनी बनावट कागदपत्रे तयार केली होती.

आरोपींकडून 75 लाखांचा मुद्देमाल जप्त

आरोपी निशांत रमेशचंद नंदवाना ऊर्फ अधितांश अग्निहोत्री यांच्याकडून तो गुन्हा करण्यासाठी वापरत असलेले सहा महागडे मोबाईल, अॅपलचे मॅकबुक, वेगवेगळ्या नावाने तयार केलेले भारत सरकार सेंट्रल पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट मध्ये चिफ प्रोजेक्ट मॅनेजर पदाचे वेगवेगळ्या नावांचे बनावट ओळखपत्रे, बनावट पॅनकार्ड, बनावट आधारकार्ड, किंमती घडयाळे, कॅमेरे, पावत्या, गुन्हयातील रोख रक्कम नऊ लाख 50 हजार रुपये, गुन्हयात वापरलेली बनावट नंबर प्लेट असलेली स्कोडा कार (बनावट नंबर युपी 32 / ईए 3434 व मुळ नंबर युपी 32 एचए 3434) जप्त करण्यात आली आहे.

आरोपी विशाल हर्षद शर्मा ऊर्फ अश्विक शुक्ला याच्याकडून तो गुन्हा करण्यासाठी वापरत असलेले सात महागडे मोबाईल (त्यामध्ये आयफोन, रेडमी, विवो), लॅपटॉप, वेगवेगळ्या नावाने तयार केलेले भारत सरकार डिपार्टमेंट ऑफ सेंट्रल हाऊसिंग मिनीस्ट्रीचे डेप्युटी डायरेक्टर पदाचे वेगवेगळ्या नावांचे बनावट ओळखपत्रे, पॅनकार्ड बनावट नावाचे आधारकार्ड, महागडी घडयाळे इत्यादीसह गुन्हयातील रोख रक्कम पाच लाख 50 हजार रुपये, गुन्हयात वापरलेली कंपास जीप कार (युपी 16 / बीएस 1520) जप्त करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींकडून एकूण 75 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

मेट्रोमोनियल साईटवरून शोधायचे सावज

दोन्ही आरोपी जीवनसाथी मेट्रोमोनियल साईटवर बनावट नावाने स्वतःचे प्रोफाईल तयार करून मुलींशी संपर्क करीत. त्यांना ते भारत सरकार डिपार्टमेंट ऑफ सेंट्रल हाऊसिंग अॅन्ड अर्बन अॅग्रिकल्चर डिपार्टमेंट, डेप्युटी डायरेक्टर व सेंट्रल पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट मध्ये चिफ प्रोजेक्ट मॅनेजर अशा मोठ्या पदावर असल्याचे सांगत असत व त्यांना त्याप्रमाणे बनावट ओळखपत्रे दाखवत असे.

आरोपी निशांत नंदवाना याने पुण्यात अधितांश अग्निहोत्री, बेंगलोरमध्ये अभव कश्यप, गुरगाव येथे आधव अग्निहोत्री अशी नावे व वेगवेगळे मोबाईल क्रमांक वापरले. तर आरोपी विशाल शर्मा याने पुण्यात अश्विन शुक्ला, बेंगलोर येथे अथर्वन तिवारी आणि गुरगाव येथे अव्याग्रह शुक्ला, रुद्रांश शर्मा, देवांश शर्मा, अचैत्य शर्मा अशी नावे आणि वेगवेगळे मोबाईल क्रमांक वापरले आहेत.

आरोपी विशाल शर्मा याच्या विरुध्द गुरुग्राम पालमपुर पोलीस स्टेशन येथे बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. दोन्ही आरोपीविरुध्द गुरुग्राम सेक्टर 40 पोलीस स्टेशन येथे बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.

पुणे, बेंगलोर, गुरगाव येथील पिडीत मुलींनी वाकड पोलिसांशी संपर्क केला असून अनेक ठिकाणी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. दोन्ही आरोपीकडे पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासामध्ये त्यांनी पुण्यातील 91 मुली, बेंगलोर येथील 142 मुली, गुरगाव येथील 22 मुलींच्या संपर्कात राहून सुमारे दीड कोटींची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. पीडित मुलींची संख्या आणि फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

पिंपरी चिंचवड पोलिसांचे आवाहन

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्फे आवाहन करण्यात आले आहे की, बनावट नावाने आरोपीनी संपूर्ण भारतभर पुणे, बेंगलोर व गुरगाव येथे अशा प्रकारे बऱ्याच मुलींचे शोषण करून त्यांना लाखो रुपयांना गंडा घातला आहे. अशा प्रकारे बळी पडलेल्या पिडीत मुलींनी तात्काळ वाकड पोलीस स्टेशन (9422008804 / 9823865502) येथे संपर्क करावा.

ही कामगिरी पोलीस आयुक्त श्री कृष्णप्रकाश, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे 1) संतोष पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे 2) रामचंद्र घाडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक एस एम पाटील, अभिजीत जाधव, बालाजी ठाकुर, पोलीस उप निरीक्षक गणेश तोरगल, पोलीस उपनिरीक्षक संगीता गोडे, पोलीस अंमलदार दिपक भोसले, विक्रम कुदळ, वंदू गिरे, भास्कर भारती, कौंतेय खराडे, शाम बाबा, कल्पेश पाटील, दत्तात्रय इंगळे, बिभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, बापुसाहेब धुमाळ, दिपक साबळे, विजय गंभीरे, प्रमोद कदम, आतिश जाधव, अतिक शेख, प्रशांत गिलबिले, राजेंद्र काळे, विकांत चव्हाण, अजय फल्ले, देवा वाघमारे, सतोष महाजन, नुतन कोडे यांनी केली. या गुन्ह्याचा तपास केलेल्या पथकाला पोलीस आयुक्तांनी 60 हजार रुपयांचा पुरस्कार जाहीर केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.