Chinchwad News: खासदार बारणे यांचा वाढदिवस कोविड योद्ध्यांना समर्पित

कोरोना काळात सेवा कार्य करणा-यांचा मंगळवारी गौरव

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी यंदाचा वाढदिवस कोविड योद्ध्यांना समर्पित करण्याचे ठरविले आहे. त्यानिमित्त सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. कोरोना काळात काम करणा-या डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांच्यासह विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणा-यांचा गौरव करण्यात येणार आहे.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात मंगळवारी (दि.16) सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. माजी राज्यपाल, साता-याचे खासदार श्रीनिवास पाटील, हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने, सिम्बॉयसिस अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते कोविड योद्ध्यांचा सत्कार केला जाणार आहे.

शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचा 16 फेब्रुवारीला वाढदिवस आहे. यंदा ते वाढदिवस साजरा करणार नाहीत. मागील 11 महिन्यांपासून आपला देश, राज्य, शहर कोरोनासारख्या महामारीचा मुकाबला करत आहे. सर्वजण घरात असताना कोरोना योद्धे मनोभावे सर्वांची सेवा करत होते. त्यांनी आपल्या जीवाची पर्वा केली नाही. कोरोना योद्ध्यांच्या प्रयत्नांमुळेच शहरातील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख कमी झाला आहे. रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे.

कोरोना कालावधीत काम करणारे डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृतदेह बांधणारे, अत्यंविधी करणारे कर्मचारी, मेडीकल असोसिएशन, अन्नधान्य पुरविणारे, प्लाझ्मा सेवा देणारी ब्लडबँक, रुग्णवाहिका सेवा पुरविणा-या योद्ध्यांना खासदार बारणे यांनी वाढदिवस समर्पित केला आहे.

या सर्व योद्ध्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याचे, खासदार श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाऊंडेशनचे गजानन चिंचवडे, रवी नामदे, बशीर सुतार, धनाजी बारणे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.