Chinchwad News: खासदार श्रीरंग बारणे यांचे व्यक्तिमत्व सतत फुलणारे – श्रीनिवास पाटील

खासदार बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योद्धयांचा सन्मान

एमपीसी न्यूज – खासदार श्रीरंग बारणे नेहमी समाजाचा विचार करतात. जनता, समाजासाठी झगडतात. त्यांचा मावळ लोकसभा मतदारसंघ सर्वात मोठा आणि दोन जिल्ह्यात विभागलेला आहे. मतदारसंघातील प्रश्नांसाठी संसदेत ते नेहमी भांडतात. देशाच्या सभागृहात प्रश्न मांडून मार्गी लावण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. खासदार बारणे यांचे व्यक्तिमत्व सतत फुलत राहणारे असल्याचे गौरवोदगार माजी राज्यपाल, साता-याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी काढले.

खासदार श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाऊंडेशनच्या वतीने मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे महासंसदरत्न खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त लोकाभिमुख कर्तव्य संपन्न, आदर्श व्यक्तीमत्वाचा, संस्थांचा आणि कोरोना योद्ध्यांचा खासदार पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात मंगळवारी (दि.16) हा कार्यक्रम झाला. खासदार श्रीरंग बारणे, सरिता बारणे, सिम्बॉयसिस अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, कामगार नेते इरफान सय्यद, नगरसेवक नीलेश बारणे, सचिन भोसले, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, शशिकिरण गवळी, मधुकर बाबर, युवा सेनेचे विश्वजित बारणे, प्रताप बारणे, धनाजी बारणे, रवी नामदे, बशीर सुतार आदी उपस्थित होते.

खासदार बारणे शेतक-यांचा मुलगा असल्याने सर्वसामान्यांच्या अडचणींची त्यांना जाण आहे. समाजाला काहीतरी देण्यासाठी ते नेहमीच पुढे असतात. आजही त्यांनी वाढदिवसानिमित्त कोरोना योद्ध्यांचा गौरव केला, असे सांगत खासदार श्रीनिवास पाटील यांनी महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीची आठवण सांगितली.

अध्यक्षपदासाठी दोन्ही बाजूने सम-समान मते होती. असे असताना खासदार बारणे यांनी स्थायी समिती अध्यक्षपद मिळविण्याची किमया कशी घडविली हे अजूनही गुलदस्यात आहे. या राजकीय घडामोडीला खासदार पाटील यांनी उजाळा दिला.

डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले, दरवर्षी वाढदिवसानिमित्त खासदार श्रीरंग बारणे समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करतात. यंदाही त्यांनी कोरोना योद्ध्यांचा सन्मान केला. काही वर्षांपूर्वी माझ्या हस्ते बारणे यांचा आदर्श युवक म्हणून टिळक स्मारकात सत्कार झाला होता. आजही ते युवकच वाटतात. बारणे यांच्यासारखे कर्तृत्ववान व्यक्तीमत्व पिंपरी-चिंचवड शहराला लाभले आहे.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहराची जडणघडण, चेहरामोहरा बदलण्यात श्रीनिवास पाटील यांचा मोटा वाटा आहे. 20 वर्षांपूर्वी मी महापालिकेच्या स्थायी समितीचा अध्यक्ष झाल्यानंतर पहिला फोन पाटील यांचा आला होता, हे मी कधीच विसरू शकत नाही. 20 वर्षे नगरसेवक आणि दोनवेळा खासदार म्हणून जनतेने निवडून दिले. मी शहर जवळून पाहिले आहे.

कोरोना काळात ज्यांनी मानव जातीची सेवा करणाऱ्यांचा आज गौरव केला आहे. कोरोना काळात माणूस माणसापासून दूर गेला होता. कोरोना योद्ध्यांनी माणुसकी जपण्याचे काम केले. डॉक्टरांनी अनेकांचे जीव वाचविण्याचे काम केले आहे. कोरोना महामारीने मानव जातील खूप काही शिकविले आहे. दोन दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही खासदार बारणे यांनी केले.

पद्मश्री पुरस्कारप्राप्त गिरीश प्रभुणे, अनेकांचा जीव वाचविणारे सिम्बॉयसिसचे डॉ. विजय नटराजन, फ्रान्समधील ट्रायलथॉन स्पर्धा जिंकणारे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

तसेच कोरोना महामारीचा सामना करत असताना समाजिक कर्तव्याची जाणीव ठेवून उत्कृष्ट सेवा देणा-या कोरोना योद्ध्यांचा गौरव करण्यात आला. डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृतदेह बांधणारे, अत्यंविधी करणारे कर्मचारी, मेडीकल असोसिएशन, अन्नधान्य पुरविणारे, प्लाझ्मा सेवा देणारी ब्लडबँक, रुग्णवाहिका सेवा पुरविणा-या योद्ध्यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या संयोजनात खासदार श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाऊंडेशनचे गजानन चिंचवडे, रवी नामदे, बशीर सुतार, धनाजी बारणे यांनी पुढाकार घेतला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.