Chinchwad News: दिव्यांग बांधवांसाठी कौशल्य प्रशिक्षण योजना राबविण्याचा महापालिकेचा मानस – आयुक्त शेखर सिंह

एमपीसी न्यूज – दिव्यांग बांधवांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन (Chinchwad News) सकारात्मक होत आहे. सुसंवाद आणि मानवी संवेदनेतून हा बदल घडत असतो. शहरातील दिव्यांग बांधव आणि दिव्यांग संघटनांसमवेत सुसंवाद साधून त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर अधिक चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्न करीत आहे. दिव्यांग बांधवांना सर्वार्थाने स्वावलंबी बनविण्यासाठी अधिक व्यापक आणि बदलत्या काळाशी समरुप असलेल्या कौशल्य प्रशिक्षण योजना राबविण्याचा महापालिकेचा मानस आहे, असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी उपस्थित दिव्यांग बांधवांसमवेत संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ.राजेंद्र वाबळे, वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. उज्ज्वला आंदूरकर, समाज विकास विभागाचे उपआयुक्त चंद्रकांत इंदलकर, सहायक आयुक्त श्रीनिवास दांगट, विशेष अधिकारी किरण गायकवाड, समाज विकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, प्रहार संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय भोसले, सम्राटसेना दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष मिलिंदराजे भोसले, झुंज संघटनेचे अध्यक्ष राजू हिरवे, पिंपरी चिंचवड मूक बधीर संघटनेचे अध्यक्ष परशुराम बसवा, सामाजिक कार्यकर्त्या संगीता जोशी यांच्यासह शहरातील विविध दिव्यांग संघटनाचे प्रतिनिधी (Chinchwad News) आणि दिव्यांग बांधव तसेच नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

PCMC News : होर्डिंग चालकांकडे 28 कोटींची थकबाकी

आयुक्त शेखर सिंह म्हणाले, दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र महत्त्वाचे असते. हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यांना हा होणारा त्रास कमी करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असेल. दिव्यांग बांधवांना विविध कार्यालयात सहजतेने पोहोचता यावे यासाठी योग्य रॅम्पव्यवस्था असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने महापालिका कार्यालयांमध्ये याबाबत दक्षता घेतली जाईल. महापालिका मुख्यालयात दिव्यांगांसाठी स्वतंत्र शौचालय तयार केले जात आहे. बीआरटी मार्गावर रस्ता ओलांडण्याकरीता सोय करण्याची गरज आहे.

दिव्यांग बांधवांना (Chinchwad News) स्वावलंबी बनविण्यासाठी महापालिकेच्या वतीने व्यापक स्वरुपात कौशल्य प्रशिक्षण योजना राबविण्याचा महापालिकेचा मानस आहे. त्यांना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी महापालिका काम करणार आहे. लहान मुलांचे अपंगत्व हे कमी वयात कळल्यानंतर त्यावर अधिक चांगल्या रितीने उपचार करता येतात. त्यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे. शहरातील प्रत्येक दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांचा लाभ घेता यावा यासाठी महापालिकेच्या वतीने शहरामध्ये सर्वेक्षण करण्याचा विचार असून शहरातील कोणताही दिव्यांग बांधव विविध योजनांपासून वंचित राहू नये असा महापालिकेचा उद्देश आहे.

मानव कांबळे महापालिकेच्या स्तुत्य उपक्रमांबद्दल कौतुक करताना म्हणाले, दिव्यांगांना आर्थिक, मानसिक आणि प्रशासकीय सहकार्य महापालिकेकडून नेहमीच मिळत असते. तसेच आम्ही करत असलेल्या मागण्यांसाठी महापालिकेकडून सकारात्मक प्रतिसाद देखील मिळत असतो. दिव्यांगांसाठी असे काम करणारी आणि विविध योजना राबविणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आशिया खंडातील एकमेव महापालिका आहे.

दिव्यांगांना विविध ठिकाणी सहजतेने पोहोचता यावे यासाठी व्यवस्था करण्यासाठी महापालिकेने प्रयत्न करावे, अशी मागणीदेखील त्यांनी यावेळी केली. दिव्यांगांसाठी असणाऱ्या योजनांना गती मिळावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. आपले प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांसमवेत सुसंवाद असणे गरजेचे असते, असे मत त्यांनी यावेळी मांडले.

अक्षय सरोदे यांनी उपस्थित दिव्यांग बांधवांसाठी ‘दिव्यांग नागरिकांना प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी’ या विषयावर प्रेरणादायी मार्गदर्शन केले. दिव्यांग बांधवांसाठी रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी सतत प्रयत्नशील असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, चिंचवड येथील मूक- बधीर विद्यालयातील मुलांच्या सांकेतिक भाषेतील राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. भारतीय संविधानाच्या प्रास्तविकेचे सामुहिक वाचन देखील करण्यात आले. भोसरी येथील पताशीबाई रतनचंदमानव कल्याण ट्रस्ट अंधशाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागतगीताने मान्यवरांचे स्वागत केले. या कार्यक्रमात दिव्यांग कल्याणकारी योजनांची माहिती देणारा प्रेरणादायी लघुपट दाखविण्यात आला. दिव्यांगांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक संस्था तसेच विशेष प्राविण्य मिळवलेल्या दिव्यांग विद्यार्थी आणि नागरिकांचा सत्कार यावेळी करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमाने या कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपआयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले. तर, सूत्रत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.