Chinchwad News : पालिकेचे कामकाज होणार स्मार्ट, संपूर्ण डेटा येणार इंटरनेटवर

स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय

एमपीसी न्यूज – स्मार्ट सिटीच्या बैठकीत पालिकेचे कामकाज स्मार्ट पद्धतीने करण्यासाठी जीआयएस (भौगोलिक माहिती प्रणाली)चा अवलंब करण्यात येणार आहे. या प्रणालीद्वारे सर्व घरांचे मॅपिंग करून संपूर्ण माहिती इंटरनेटच्या महाजालावर आणली जाणार आहे. याबाबत पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आले.

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संचालक मंडळाची अकरावी बैठक आज (शुक्रवार दि.11) ऑटोक्लस्टर चिंचवड येथे झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा उर्फ माई ढोरे होत्या.

सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, विरोधी पक्षनेते राजु मिसाळ, प्रमोद कुटे, सचिन चिखले, केंद्र शासनाच्या प्रतिनिधी ममता बात्रा, पीएमपीएमएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त कृष्णा प्रकाश सर्व संचालक, पालिका आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्रावण हर्डीकर सभेस उपस्थित होते.

याव्यतिरीक्त सह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण व राजन पाटील, मुख्य वित्तिय अधिकारी जितेंद्र कोळंबे, जनरल मॅनेजर इन्फ्रास्ट्रकचर अशोक भालकर सभेस उपस्थित होते.

बैठकीत मान्यता दिलेले विषय –

# पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, विरोधी पक्षनेते राजु मिसाळ यांची नव्याने संचालक मंडळावर नियुक्ती करण्यात आली. जितेंद्र कोळंबे यांना मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून मान्यता देण्यात आली.

# पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडसाठी बिजनेस प्लॅन तयार करण्यात आला आहे. त्याबाबतचा अहवाल संचालक मंडळासमोर मांडण्यात आला. या अहवालाबाबत संचालक मंडळाने भविष्यातील योजनांचे बिजनेस प्लॅन तयार करून पुन्हा अहवाल सादर करण्याची सूचना दिली.

# एरिआ बेस डेव्हलपमेंट प्रकल्पाअंतर्गत खेळाच्या मैदानाच्या सुधारणेसाठी 25 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पांतर्गत पिंपळे सौदागर भागामध्ये पी. के. चौकाजवळील लिनिअर गार्डनमध्ये शहरातील तरुणांसाठी अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅक्टिव्हिटी करण्यासाठी बी.एम.एक्स पार्क आणि लहान मुलांच्या खेळाच्या जागा तयार करण्यात येणार आहेत.

# रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाअंतर्गत स्मार्ट घटकांचा समावेश करुन स्मार्ट रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प संपुर्ण शहरामध्ये राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली.

# जीआयएस आधारीत ईआरपी प्रकल्पाअंतर्गत महापालिकेचे कामकाज अधिक वेगाने व अचुकतेने बनविण्यासाठी जीआयएस, ईआरपी, वर्क फ्लो मॅनेजमेंट अशा तीन घटकांची एकत्रितपणे अंमलबजावणी होणार आहे.

इआरपी संकल्पना काय आहे

वित्तीय व्यवस्थापन प्रणाली, मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली, मालमत्ता व्यवस्थापन प्रणाली, इन्व्हेंटरी व्यवस्थापन प्रणाली, प्रकल्प व्यवस्थापन प्रणाली, खरेदी व्यवस्थापन प्रणाली यांचे स्मार्ट पद्धतीने एकत्रीकरण केले जाणार आहे.

जीआयएस संकल्पना काय आहे

जीआयएस या घटकाअंतर्गत संपुर्ण शहरासाठी बेसमॅप बनविला जाणार आहे. तसेच शहरातील मिळकतींचा डोअर-टु-डोअर सर्वे आणि आधुनिक लीडर (LIDAR) सर्वे केला जाणार आहे. या कामाचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर शासकीय व खाजगी मालमत्तांचे मॅपिंग होणार आहे. तसेच यामुळे प्रॉपर्टी टॅक्स लिकेजचे प्रमाण कमी होणार आहे. महापालिकेच्या उत्पन्नात यामुळे भर पडेल.

वर्क फ्लो मॅनेजमेंट संकल्पना काय आहे

याअंतर्गत अधिकाअधिक पालिकेच्या विविध पद्धती पेपरलेस बनविण्यात येणार आहेत. या घटका मार्फत नागरीकांना घरी बसून पालिकेच्या वेगवेगळ्या प्रकाराचे अर्ज करता येतील. त्यांचे लाईव्ह-स्टेटस (Real Time) बाबत माहिती उपलब्ध होणार आहे. पालिकेच्या उपलब्ध माहितीच्या मदतीने, अहवाल सहजतेने आणि अत्यंत अचूकतेने तयार करता येऊ शकणार आहे. हा अहवाल आणि आकडेवारी पालिकेच्या निर्णय प्रक्रियेत मदत करेल.

या कामासाठी सुमारे 116.60 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. अटॉस इंडिया प्रा. लि. या कंपनीने हे काम 112.66 कोटी रुपयांना करण्याचे मान्य केले आहे. या कामाच्या अंमलबजावणीचा कालावधी दोन वर्ष असून देखभाल व दुरुस्तीसाठी पाच वर्षांचा कालावधीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.