Chinchwad News : पोलिसांच्या मुलामुलींमधून भावी उद्योजक घडविण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांची नवी संकल्पना

एमपीसी न्यूज – सेवेत कार्यरत असलेले तसेच सेवानिवृत्त पोलिसांच्या मुलामुलींना उद्योजक बनविण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी नवीन उपक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत पोलिसांच्या मुलामुलींना प्रशिक्षण आणि सवलतीसह कर्ज उपलबध करून दिले जाणार आहे. यामुळे पोलिसांच्या पाल्यांमधून भावी उद्योजक होण्यासाठी याची मदत होणार आहे.

पोलीस हा घटक अनेक वेळेला दुर्लक्षित राहतो. त्यात ड्युटीची वेळ निश्चित नसल्याने कुटुंबाकडे लक्ष इतरांच्या तुलनेत कमी होते. आपल्या मुलामुलींसाठी अनेक गोष्टी करण्याचे नियोजन पोलिसांच्या केवळ मनातच असते. यावर उपाय काढत पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी नवीन संकल्पना हाती घेतली आहे. या संकल्पनेत पोलिसांच्या मुलामुलींना उद्योजक बनविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, पुणे यांच्या सहकार्याने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात कार्यरत असलेले आणि सेवानिवृत्त झालेल्या सर्व पोलिसांच्या मुलामुलींची माहिती जमा करून त्यांना या उपक्रमाबाबत सांगण्यात येणार आहे. त्यानंतर एका मेळाव्याचे आयोजन करून त्यात त्यांना योग्य ते मार्गदर्शन आणि मदत केली जाणार आहे.

पोलिसांच्या सर्व पाल्यांना स्वतःचा व्यवसाय, उद्योग सुरु करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. या उपक्रमातून शासनाकडून बँकेच्या माध्यमातून 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होऊ शकणार आहे. या कर्जावर 15 ते 35 टक्क्यांची शासनाची सबसिडी देखील आहे. त्यामुळे पोलिसांचे पाल्य मोठ्या प्रमाणात भावी उद्योजक होण्यास मदत होईल, असा विश्वास पोलीस आयुक्तांनी व्यक्त केला आहे.

या उपक्रमांतर्गत फळ प्रक्रिया, अन्न प्रक्रिया, दुग्ध प्रक्रिया, सोलर प्रक्रिया, हाऊस किपींग, केटरिंग, गार्डनिंग, टू व्हीलर गॅरेज, इलेक्ट्रिकल होम अप्लायन्सेस, मसाले, पॅकेजिंग, गारमेंट मेकिंग, पेंटस, प्लम्बिंग आणि अन्य प्रकारचे उद्योग करता येणार आहेत.

कार्यरत असलेले आणि सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचा-यांच्या मुलामुलींची माहिती जमा करून त्यांच्याकडून फॉर्म भरून घेण्याच्या सूचना सर्व पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना देण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.