Chinchwad News : पिंपरी चिंचवड शहरात नवीन पोलीस उपायुक्तांची बदली

एमपीसी न्यूज – मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या बढती, बदल्यांमध्ये पिंपरी चिंचवड शहरातील पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांची बढतीवर बदली झाली. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर नवीन पोलीस उपायुक्तांची बदली करण्यात आली आहे. डॉ. काकासाहेब आदिनाथ डोळे यांची शहरात बदली झाली आहे.

राज्य पोलीस सेवेतील पोलीस अधीक्षक, उपायुक्त संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. याबाबतचे आदेश गुरुवारी (दि. 9) गृह विभागाने दिले आहेत. यामध्ये डॉ. काकासाहेब आदिनाथ डोळे यांची पोलीस उप आयुक्त म्हणून पिंपरी चिंचवड शहरात बदली झाली आहे. उपायुक्त डॉ. डोळे हे पोलीस प्रशिक्षण केंद्र लातूर येथे कार्यरत होते.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात (मुख्यालय) कार्यरत असलेले पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांच्याकडे मुख्यालय तसेच गुन्हे शाखेची जबाबदारी होती. 23 ऑगस्ट रोजी गृह विभागाने काढलेल्या आदेशात त्यांना बढती देण्यात आली आहे. पोलीस उपमहानिरीक्षक, गुन्हे, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे त्यांची बढतीने बदली करण्यात आली आहे. सुधीर हिरेमठ यांना अद्याप कार्यामुक्त करण्यात आले नव्हते. आता नवीन उपायुक्तांची बदली झाली असल्याने हिरेमठ यांना कार्यामुक्त करण्यात येईल, अशी पोलीस वर्तुळात चर्चा सुरू आहे.

तसेच गुरुवारी राज्य पोलीस सेवेतील पोलीस उप अधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त संवर्गातील अधिकाऱ्यांच्या देखील बदल्या झाल्या आहेत. त्यात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या देहूरोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील यांची पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय) अहमदनगर येथे बदली झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.