Chinchwad News : पिंपरी-चिंचवड शहरात एक उपायुक्त, दोन सहाय्यक आयुक्तांची बदली

एमपीसी न्यूज – राज्य गृह विभागाने बुधवारी (दि. 30) मोठ्या प्रमाणात पोलीस अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरात एक पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी आणि दोन सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर शहरातील दोन सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

गृह विभागाने भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी आणि राज्य पोलीस सेवेतील पोलीस अधीक्षक, उप आयुक्त संवर्गातील 29 पोलीस अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक येथे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले आनंद भोईटे यांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात पोलीस उपायुक्त पदावर बदली केली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच राज्य पोलीस सेवेतील पोलीस उप अधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त या संवर्गातील 105 पोलीस अधिका-यांच्या देखील बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये नंदकुमार जयवंत पिंजण आणि नंदकिशोर सदाशिव भोसले पाटील यांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर बदली करण्यात आली आहे.

नंदकुमार पिंजण हे यापूर्वी राज्य गुप्तवार्ता विभाग पुणे येथे अपर पोलीस उप आयुक्त पदावर कार्यरत होते. तर नंदकिशोर भोसले पाटील सोलापूर लोहमार्ग येथे सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर कार्यरत होते.

पिंपरी-चिंचवड शहरातील दोन सहाय्यक पोलीस आयुक्तांची बदली झाली आहे. पिंपरी आणि चाकण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव यांची पोलीस प्रशिक्षण विद्यालय जालना येथे पोलीस उप अधीक्षक पदावर बदली करण्यात आली आहे.

तर सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांची महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी, पुणे येथे अपर पोलीस अधीक्षक पदावर बदली करण्यात आली आहे.

शहरात एक पोलीस उप आयुक्त वाढले आहेत. दोन सहाय्यक पोलीस आयुक्त बदलून गेले आहेत. तर दोन सहाय्यक पोलीस आयुक्तांची शहरात बदली झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.